महत्वाची बातमी! सिमकार्डच्या खरेदी-विक्रीबाबत उद्यापासून लागू होणार नवा नियम
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२३ । गेल्या काही वर्षांत देशात बनावट सिमकार्डमुळे होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कठोर भूमिका घेत दूरसंचार विभागाच्या मदतीने नवीन नियम जारी केले आहेत.
नवीन नियम नेमका काय?
दूरसंचार विभागाने आणलेल्या या नवीन नियमानुसार, सिमकार्ड विक्रेत्यांना ग्राहकाच्या योग्य केवायसीची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच, एकाच वेळी एकापेक्षा जास्त सिम खरेदी करता येणार नाही किंवा विकताही येणार नाही, त्यामुळे नवीन नियमानुसार दोन्हीवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, एका आयडीवर मर्यादित संख्येतच सिम कार्ड जारी केले जाऊ शकतात. या सर्व नियमांची काळजी न घेतल्यास ते तुरुंगातही जाऊ शकते.
हे नियम 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार होते, परंतु सरकारने 2 महिन्यांचा अतिरिक्त वेळ दिला. त्यामुळे हा नवीन नियम आता उद्या म्हणजेच 1 डिसेंबर 2023 पासून लागू होणार आहे. सर्व पॉइंट ऑफ सेल (PoS) म्हणजेच सिम विक्रेत्यांनी आज 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करणे अनिवार्य असेल. या नियमांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. गंभीर प्रकरणात तुरुंगात जावे लागू शकते.
देशातील फसवणुकीला आळा बसेल
काही काळापासून बनावट सिमकार्डमुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत होती. सिमकार्ड विक्रेत्याकडून योग्य पडताळणी आणि चाचणी न करता नवीन सिमकार्ड देणे हे त्यामागचे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सरकारने यावर कडक कारवाई करत असे बनावट सिमकार्ड विकल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो, असे स्पष्ट केले. तसेच परवाना काळ्या यादीत टाकला जाऊ शकतो.