जळगाव लाईव्ह न्यूज | २४ सप्टेंबर २०२३ । राज्यावर पुन्हा भारनियमनाचे संकट उभे ठाकले आहे. नियमांनुसार महानिर्मितीच्या केंद्रांमध्ये १४ दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा शिल्लक असणे अनिवार्य आहे. मात्र सध्या सरासरी चार दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. याचे कारण म्हणजे सध्या सुरु असलेल्या पावसामुळे कोळसा खाणीतून निघणाऱ्या कोळशाचे प्रमाण कमी झाले. यामुळे आता महानिर्मितीच्या राज्यभरातील सातही औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना कोळसा टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
राज्यातील गणेशोत्सव व आगामी काळातील सण उत्सवांमुळे दिवाळीपर्यंत विजेची मागणी कायम राहणार आहे. पूर्ण क्षमतेने अर्थात साडेसात हजार मेगावॅट वीजनिर्मिती करायची असल्यास किमान रोज ६७ हजार ५०० टन कोळशाची गरज भासते. त्यानुसार सध्या जवळपास सव्वालाख टनांची तूट आहे. मात्र, कोळसा खाणींमधून दररोज कमी प्रमाणात का असेना कोळसा उपलब्ध होत असल्याने वीजनिर्मिती सुरु आहे. कोणतेही केंद्र कोळशाअभावी बंद झाले नाही. मात्र, हीच स्थिती कायम राहिल्यास १०० टक्के क्षमतेने वीजनिर्मिती करण्यास अडचणी येतील.
महानिर्मितीच्या राज्यभरातील सात औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांत सध्या ६ लाख ७० हजार टन कोळसा साठा आहे. आता कोळशाअभावी वीजनिर्मिती घसरली तर राज्यात पुन्हा काही वितरण ग्रुपवर वीजभारनियमन होण्याची भिती आहे. केंद्रीय वीज प्राधिकरणाच्या नियमानुसार वीज केंद्रामध्ये कमीत कमी १५ दिवसांचा साठा असायला हवा.मात्र सध्या सरासरी चार दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे.