जळगाव लाईव्ह न्यूज| ३ ऑगस्ट २०२३। सालबर्डी येथील अल्पसंख्यांक शासकीय तंत्रनिकेतनचे बांधकाम त्रुटी दूर करून तातडीने पूर्ण करा, याबाबत आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून मागणी केली. अल्पसंख्यांक समाजाचा विकास व्हावा, यासाठी आमदार एकनाथ खडसे हे अल्पसंख्यांक विकास मंत्री असताना त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यात सालबर्डी येथे अल्पसंख्यांक समाजासाठी शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) महाविद्यालय मंजूर केले होते. त्याचे काम २०१८ पासून सुरू असून, गेल्या अनेक दिवसांपासून हे काम रेंगाळले आहे.
बुधवारी आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्न विचारून हे काम ज्या अडचणीमुळे प्रलंबित आहेत, त्या अडचणी सोडवून चालू शैक्षणिक वर्षापासून अल्पसंख्यांक समाजासाठी असणारे हे पॉलिटेक्निक महाविद्यालय सुरू करण्याची मागणी केली. महाविद्यालय इमारतीच्या काही भागाच्या बांधकामासाठी व परिसरातील नागरिकांसाठी रस्ता, जागा उपलब्ध नसल्याने बांधकामाचा वेग मंदावला आहे.
सदर महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकाऱ्यांद्वारे भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण केल्यामुळे सद्य:स्थितीत महाविद्यालयाचे काम पूर्णत्वास आलेले आहे काय? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी मुक्ताईनगर येथील शासकीय अल्पसंख्यांक तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करून चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रकिया राबविण्यात यावी, अशी मागणी आमदार खडसे यांनी केली.
या प्रश्नाला अल्पसंख्यांक विकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, की सालबर्डी शिवार मुक्ताईनगर येथील शासकीय अल्पसंख्यांक तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) महाविद्यालयाच्या इमारतीच्या काही भागाच्या बांधकामासाठी व परिसरातील नागरिकांसाठी रस्ता, यासाठी जागा उपलब्ध नसल्याने बांधकामाचा वेग मंदावला आहे.
त्यासाठी आवश्यक जागेची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने सदर तंत्रनिकेतन इमारतीचे बांधकाम अपूर्ण आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या मानंकानुसार प्रथम वर्षासाठी इमारतींचे बांधकाम परिपूर्ण अवस्थेत असणे आवश्यक आहे. या तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असल्याने, चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया सुरु करणे शक्य नाही, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.