जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२३ । एक ते दोन तास नव्हे तर तब्ल १२ तास घरीच राहून छातीचे दुखणे अंगावर सहन केलेल्या ६० वर्षीय रुग्णाला अखेरीस तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्याची प्रकुती अत्यावस्थ झाली. अशा अवस्थेत रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हृदयविकार तज्ञांनी तात्काळ कॅथलॅमध्ये घेऊन जोखीम स्विकारत आपल्या अनुभवाच्या आधारे प्रायमरी एन्जीओप्लास्टी आणि हृदयाचे ठोक्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पेसमेकर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली. हृदयालयातील तत्पर सेवेमुळे मी आज जिवंत आहे, असे म्हणत रुग्णाने आभार मानले.
भुसावळ येथील उमेश (नाव बदल) नामक ६० वर्षीय रुग्णाने हृदयविकाराच्या झटक्याला हलक्यात घेतले मात्र तेच दुखणे त्याच्या जीवावर बेतले. अतिगंभीर अवस्थेत रुग्णाला डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयालयात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णाच्या हृदयाचे ठोकेही जलदगतीने वाढले. रुग्णाचा ईसीजी देखील खुप खराब होता. त्यामुळे खुप मोठे आव्हान डॉक्टरांसमोर उभे राहिले. येथे डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील व डॉ.सुमित शेजोळ यांनी आव्हान स्विकारत रुग्णावर तातडीने उपचार सुरु केले. एन्जीओप्लास्टी सुरु असतांनाच अचानक हृदयाचे ठोकेही वाढले. त्यावेळी शॉक ट्रिटमेंटही देण्यात आली. हृदयविकार तज्ञांनी आपले कौशल्य पणाला लावून केवळ अर्धा तासात जलदगतीने शास्त्रशुद्धरित्या शस्त्रक्रिया यशस्वी केली. शस्त्रक्रियेनंतर करण्यात आलेला ईसीजी हा नॉर्मल आला.
महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत मोफत उपचार
यामुळे सदर रुग्णाने हृदयालयातील डॉक्टरांद्वारे झालेले उपचार तसेच अतिदक्षता विभागात डॉक्टर्स तसेच नर्सिंग स्टाफने केलेली सेवा याद्दल आभार मानले. हृदयालयातील उपचारांसाठी येथे शासनाच्या सर्व योजना लागू असून सदर रुग्णावर महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत उपचार करण्यात आले. अतिगंभीर अवस्थेत आलेला रुग्ण स्वत:च्या पायावर चालत आनंदाने घरी परतला.
छातीचे दुखणे हलक्यात घेऊ नका – डॉ.वैभव पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरिर माणसाला संकेत देत असते. यात काही रुग्णांना थंड घाम येणे, शरीर गार पडणे, उलटी होणे, छातीत तीव्र वेदना, पाठीत वरच्या भागात चमका येेणे, खांदा दुखणे अशी लक्षणे साधारणत दिसतात. यापैकी कुठलेली लक्षण दिसून आल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका, लगेचच डॉक्टरांना भेटा. हृदयविकाराचा रुग्ण जितक्या लवकर इस्पीतळात येईल तितके उपचार जलगद आणि रुग्णाची रिकव्हरी जास्त मिळते, त्यामुळे छातीचे कुठलेही दुखणे हलक्यात घेऊ नका, असा सल्ला हृदयालयातील डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांनी दिला.