जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२३ । आधीच मान्सून उशिरा दाखल झाला. ८ जून रोजी मान्सून केरळात दाखल झाल्यांनतर तीनच दिवसात तो महाराष्ट्रात दाखल झाला होता. मात्र देशावर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या संकटाने आल्याने मान्सून खोळंबला. यामुळे राज्यातील काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस तर काही ठिकाणी उन्हाचा तडाखा पाहायला मिळाला. दरम्यान, जळगावात तापमानाचा पारा पुन्हा वाढणार आहे.
‘बिपरजॉय’ वादळ राजस्थानात धडकल्यानंतर गती मंदावली असून सोमवारपर्यंत वादळ शमण्याची शक्यता आहे. यानंतर राज्यासह जळगाव जिल्ह्यात आर्द्रता वाढून उन्हा एकदा तापमानाचा पारा पुन्हा वाढणार आहे. काल शनिवारी ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा ४०.४ अंशांवर होता.
‘बिपरजाॅय’ वादळामुळे गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची शक्यता वाढली होती; परंतु वादळ गुजरातमार्गे राजस्थानात वळल्याने पावसाची शक्यता आता कमी झाली आहे. रविवारी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांचा कडकडाट होईल; परंतु पाऊस तुरळक असणार आहे. तर काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येऊ शकते.
बिपरजॉय वादळ शमल्यानंतर जिल्ह्यात आर्द्रता वाढेल. तापमानात काहीअंशी वाढ होईल. तर २४ जूननंतर नियमित पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी ४ वाजता आभाळ चांगलेच भरून आले होते.