जळगाव लाईव्ह न्यूज | ४ मे २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून पायउतार होत निवृत्तीची घोषणा केली. याशिवाय राज्यसभेची टर्म संपली की निवडणूक लढवणार नाही, असेही जाहीर केले. शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यानंतर राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांचे राजीनामा सत्र सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनीही आपल्या आमदारकीचाही राजीनामा देण्याची तयारी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्याशिवाय पुर्ण होवूच शकत नाही. जर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला नाही, तर मी माझा आमदारकीचा राजीनामा पक्षाध्यक्षाकडे देणार असल्याची भूमिका आमदार अनिल पाटील यांनी घेतली आहे. शरद पवार यांनी सर्वसामान्य जनतेसह पक्षातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करुन आपला निर्णय मागे घ्यावा अशीही मागणी अनिल पाटील यांनी केली. तसेच जर ते आपला निर्णय मागे घेणार नाहीत, तर आमदारकीचा राजीनामा आम्ही देणार आहोत. माझ्यासह पक्षातील इतर आमदार देखील आपल्या आमदारकीचा राजीनामा देतील असेही अनिल पाटील म्हणाले.
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे. एकेकाळी जळगाव जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते. माजी खासदार ईश्वरलाल जैन व विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. माजी आमदार गुलाबराव देवकर यांना देखील शरद पवारांच्या आशिर्वादाने मंत्रीपदाची लॉटरी लागली होती. डॉ.सतीष पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, नुकतेच राष्ट्रावादीवासी झालेले एकनाथ खडसे यांनी अद्याप स्पष्ट भुमिका मांडलेली नाही. यामुळे ऐकेकाळी भाजपात असलेले व आता राष्ट्रवादीचे आमदार असलेले अनिल पाटील यांची राजीमान्याची भुमिका चांगलीच चर्चेत आली आहे.
५ मे रोजी होणार अध्यक्षपदाचा फैसला
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे. सध्यातरी खासदार सुप्रिया सुळे यांचेच नाव आघाडीवर आहे. सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्षा झाल्या तर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व सूत्रे अजित पवारांकडे येतील, असे चित्र आहे. अजित पवार यांना राष्ट्रीय स्तरावर नव्हे राज्याच्याच राजकारणात जास्त रस आहे. याशिवाय प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, सुनील तटकरे यांचीही नावे चर्चेत आहे. नवीन अध्यक्षाच्या निवडीबाबत समिती स्थापन करण्यात आली असून या समितीची ५ मे रोजी बैठक होणार आहे. त्या बैठकीत जो काही निर्णय घेण्यात येईल तो आपल्याला मान्य असेल, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे.