जळगाव लाईव्ह न्यूज | १८ फेब्रुवारी २०२३ |अॅपल कंपनीचे आयफोन किंवा मॅकबूक (लॅपटॉप) हे त्याच्या तगड्या सिक्यूरिटीसाठी जगभरात ओळखले जातात. अॅपलचे कोणतेही प्रॉडक्ट हॅक करणे जवळपास अशक्य असते, असे मानले जाते. मात्र अॅपलच्या मॅकबूकमध्येही एक बग होता. बग म्हणजे अशी तांत्रिक चूक किंवा त्रुटी ज्यामुळे मॅकबूकमधील डेटा हॅक होवून चोरी होण्याची शक्यता होती. हा बग शोधून काढला आहे, एका खान्देशी तरुणाने…
ओम कोठावदे असे या तरुणाचे नाव असून तो नंदुरबार जिल्ह्यातील खापर (ता.अक्कलकुवा) येथील रहिवासी आहे. ओमच्या या कामागिरीबद्दल अॅपल कंपनीने त्यास ११ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ओमच्या या यशामुळे खान्देशच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ओम कालिदास कोठावदे याचे शिक्षण नंदुरबार येथे झालेले आहे. सध्या तो पुणे येथे पुढील शिक्षण घेत आहे. त्यास संगणकाचे चांगले ज्ञान आहे. याच ज्ञानामुळे त्याच्या लक्षात आले कि, अॅपल मॅकबुकमधील डेटा चोरी होवू शकतो. मॅकबुकची स्क्रिन बंददरम्यान डेटा चोरी करणे शक्य असल्याची खातरजमा त्याने स्वत: करुन बघितली.
या बगची माहिती त्याने ईमेल व्दारे अॅपलच्या अमेरिकेतील मुख्यालयाला पाठवली. यानंतर अॅपल कंपनीच्या अमेरिकेतील तज्ञांनी ओमशी संपर्क साधून सविस्तर माहिती जाणून घेतली. ओमने प्रात्याक्षिक करुन दाखविण्यासह डेमो स्क्रिनशॉय कंपनीला पाठवले. याचवेळी त्यावर उपाययोजनाही सुचवल्या. त्याची पडताळणी केल्यानंतर कपंनीने ओमचे कौतूक करत आभार मानले.
ओम हा आश्रमशाळा पेचरीदेव, ता. अक्कलकुवा येथील मुख्याध्यापक कालिदास विठ्ठल कोठावदे यांचा तो मुलगा आहे. ओमच्या या कामगिरीबद्दल अॅपल कंपनीने त्यास नुकताच ईमेल पाठविला आहे. अॅपलकडून पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये म्हटले की, आपण पाठवलेला रिपोर्ट क्वॉलिफाई करण्यात आला आहे.
यामुळे अॅपलची समस्या सोडण्यास मदत झाली आहे. तुम्हाला १३.५ हजार डॉलर बक्षीस म्हणून जाहीर करीत असल्याचे सांगत आभार मानले आहेत. खान्देशी तरुणाच्या ज्ञानाचे थेट अॅपल कंपनीने कौतूक केल्याने खान्देशचा डंका अमेरिकेतही वाजतो, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.