जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२२ । ‘देव तारी त्याला कोण मारी’ याची प्रचिती नुकतेच मुंबई येथे एका महिलेला आली आहे. मानखुर्द रेल्वे स्थानकावर लोकलमध्ये चढत असताना अचानक तोल गेल्याने महिला आपल्या चिमुकल्यासह खाली कोसळत होती. नेमके त्याच वेळी त्याठिकाणी असलेले आरपीएफ कर्मचारी अक्षय सोये यांनी उडी घेत बाळाला आणि आईला रेल्वेच्या बाहेर ओढले. बाळाला वाचविण्यात सोये यांना यश आले तर पुढे प्लॅटफॉर्मवर एका व्यक्तीने मातेला देखील ओढल्याने ती देखील बचावली आहे. अक्षय सोये हे मूळ चोपडा तालुक्यातील पंचक गावाचे रहिवासी असून नोकरीला मुंबईत आहेत.
मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर दुपारी १२.०२ वाजता सीएसएमटीकडे जाणारी लोकल आली असता सुमनसिंह यांनी त्यांच्या कडेवर असणाऱ्या बाळासह डब्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान प्रवेशद्वारावर असणारी गर्दी आणि लोकलने पकडलेल्या वेगामुळे सुमन यांना चढता आले नाही. लोकलच्या वेगामुळे सुमन यांच्या हातातील लहान मुलाचा तोल जाऊ लागल्याने त्या भांबावल्या.
रेल्वे स्थानकावर त्याच वेळी मानखुर्द आरपीएफचे कुर्ला सीआयबी पथकाचे कर्मचारी अक्षय सोये हे उभे होते. महिला आणि बाळाला पाहून त्यांनी लागलीच धाव घेत बाळाला बाहेर ओढले. महिलेच्या हातातून बाळाला वाचविण्यात अक्षय सोये यांना यश आले. त्यांनी अलगत बाळाला हातावर झेलल्याने त्याला इजा देखील झाली नाही. तर सुमन यांनी लोकलचा दरवाजा पकडून ठेवल्यामुळे त्या फलाटाच्या अखेरपर्यंत फरफटत गेल्या. अखेर फलाटाच्या शेवटच्या टोकाला असणाऱ्या एका प्रवाशाने सतर्कता दाखवून सुमन यांना बाहेर ओढून घेत लोकलखाली जाण्याआधीच वाचवले.
महिलेचे नाव सुमन सिंह असून त्या नवी मुंबईतील बोनकोडे परिसरातील रहिवासी आहेत. आपल्या एका परिचित महिलेसोबत त्या लोकलने जात होत्या. अक्षय सोये यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानमुळे आज मातेसह बाळाचा जीव वाचला आहे. अक्षय सोये यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून एएनआय या वृत्तसंस्थाने देखील व्हिडीओ ट्विट केला आहे.