जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२२ । रेल्वे भरती बोर्ड मार्फत नोटीस क्रमांक RRC-ER/Act Apprentices/2020-21 अंतर्गत आयटीआय व १० वीच्या गुंपात्राकावरील नावात साम्य नसल्यामुळे रेल्वे अप्रेंटिससाठी नाकारण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांना; खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे भरती बोर्डकडे केलेला पाठपुरावा व प्रयत्नांमुळे पुन्हा संधी मिळणार आहे.
रेल्वे भरती बोर्ड मार्फत नोटीस क्रमांक RRC-ER/Act Apprentices/2020-21 द्वारे पूर्व रेल्वे विभाग अंतर्गत अप्रेंटिस साठी वेगवेगळ्या मंडळ व वर्कशॉप साठी एकूण २९४५ जागांची भरती काढण्यात आली होती. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर अनेक उमेदवारांना १० वी गुणपत्रक व आयटीआय गुणपत्रक वरील नावात साम्य नसल्यामुळे रेल्वे विभागामार्फत नाकारण्यात (रिजेक्ट) आले होते. यावेळी सदर इच्छुक उमेदवारांनी याबाबत तक्रार केली असता, खासदार रक्षा खडसे यांनी “रेल्वे भरती बोर्ड, दिल्ली व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय” यांच्याकडे पाठपुरावा करून सदर गोष्ट लक्षात आणून दिली असता, नाकारण्यात आलेल्या उमेदवारांना अप्रेंटीशीप साठी संधी देणेबाबत रेल्वे भरती सेल, पूर्व रेल्वे, कोलकता यांनी दि.१०/१०/२०२२ पत्राद्वारे खासदार रक्षा खडसे यांनी कळविले असून, त्याबाबत तशा सूचना पूर्व रेल्वे विभागास दिल्या आहे.
यासाठी सदर नाकारण्यात आलेल्या उमेदवारांना नाव एकच असल्याबाबतचे श्रेणी एक अधिकाऱ्याच्या सहीनिशी स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र सात दिवसाच्या आत रेल्वे विभागाकडे सादर करायचे आहे. तसेच याबाबत सदर उमेदवारांना काही इतर अडचण असल्यास त्यांनी खासदार संपर्क कार्यालय, मुक्ताईनगर दूरध्वनी क्रमांक ०२५८३-२३५०५० वर दिलेल्या मुदतीच्या आत संपर्क साधायचा आहे, अशी माहिती खासदार रक्षा खडसे यांच्यामार्फत देण्यात आली.