जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२२ । बहिणीला कामाला का नेतात ? या कारणावरून एका महिलेच्या डोक्यात काठी मारल्याने महिलेचा मृत्यू ओढवला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर एरंडोल तालुक्यातील खडके खुर्द येथील समाधान धनगर यास न्यायालयाने सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात सहा वर्ष कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
छायाबाई किशोर महानुभाव, पती किशोर शेनफडू महानुभाव, मुलगी पूजा व सरला उर्फ गुड्डी तुकाराम धनगर असे चौघे 15 मे 2016 रोजी बैलगाडीने शेतात जात असताना सरलाचा भाऊ तथा संशयीत आरोपी समाधान धनगर, आई सुबाबाई धनगर वडिल तुकाराम त्र्यंबक धनगर असे या चौघांजवळ आले व त्यांनी सरलाला तुम्ही कामाला का घेऊन जातात असा जाब विचारुन शिवीगाळ केली होती तर समाधान याने हातातील काठीने छायाबाई हिच्या डोक्यावर मारल्याने त्या जखमी झाल्या होत्या. छायाबाई यांनी उपचार घेत असताना जवाब दिल्यानंतर एरंडोल पोलिसात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. 18 मे 2016 रोजी छायाबाई यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.
तपासाधिकारी एम.एस.बैसाणे यांनी तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले. तर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहन देशपांडे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. मयताची मुलगी पूजा, डॉ.शेख आसीफ इकबाल, डॉ.प्राजक्ता भिरुड, डॉ.मुकेश चौधरी, मृत्यूपुर्व जबाब घेणारे सहायक फौजदार भालचंद्र पाटील आदींसह 14 जणांच्या साक्षी घेण्यात आल्या. सरकारपक्षाचा पुरावा व सरकारी वकील प्रदीप महाजन यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने समाधान धनगर याला 304 (2) सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी धरुन सहा वर्ष कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर गुन्ह्यातील दुसरा आरोपी तुकाराम धनगर खटला ससुरू असताना त्याचा मृत्यू झाला तर सुबाबाई हिची निर्दोष मुक्तता करण्यात आली. विशेष म्हणजे मयताचे पती व सरला हे दोघे जण फितूर झाले होते.