जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२२ । शिवतीर्थावर होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यावर सोनिया गांधी व शरद पवार यांचे विचार मांडू नका असा टोला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेला लगावला होता. यावर उत्तर देताना जळगाव जिल्हा शिवसेना जिल्हा संघटक गजानन मालपुरे यांनी लॉकडाऊन मध्ये दारू कशी विकावी आणि रुग्णांच्या टाळूवरच लोणी कसं खावं? असे विचार मांडायचे का? असा प्रश्न मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारला आहे.
तर झालं असं की, दरवर्षी शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतो. या दसरा मेळाव्यामध्ये पक्षप्रमुख व शिवसेनेचे नेते शिवसैनिकांना मार्गदर्शन करत असतात. शिवसैनिकांसाठी दरवर्षी येणारा दसरा हा फार महत्त्वाचा असतो. मात्र यंदा शिवसेनेत फूट पडल्यामुळे शिवतीर्थ मैदानावरच्या दसरा मेळाव्यासाठी दोन्हीही शिवसेनेच्या गटांनी दावा केला होता. मात्र ठाकरे गटाला न्यायालयाने दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे.
यामुळे यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले होते की, दसरा मेळाव्याला परवानगी मिळाली म्हणून शिवसेनेचे अभिनंदन. न्यायालयाने दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे. मात्र दसरा मेळाव्यामध्ये सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे विचार ऐकायला यायला नको. यावर उत्तर देताना शिवसेनेचे जिल्हा संघटक गजानन मालपुरे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना उत्तर दिले आहे.
यावेळी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणाले आहेत की,लॉक डाऊन मध्ये दारू कशी विकावी आणि रुग्णांच्या टाळूवरच लोणी कसं खावं? असे विचार मांडायचे का?