जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२२ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मंगळवारी जळगाव जिल्हा दौर्यावर आले असून दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास विशेष विमानाने त्यांचे विमानतळावर आगमन झाले. त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. यावेळी त्यांचे शिंदे गटाचे नेते आणि पदाधिकार्यांनी स्वागत केले. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. किशोरआप्पा पाटील, आ. लताताई सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आदींसह अन्य नेत्यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
विमानतळावरील स्वागतानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुसुंबा, रायपूर, अजिंठा चौफुली, इच्छादेवी चौफुली आणि यानंतर आकाशवाणी चौकात आगमन झाले. येथे माजी महापौर ललीत कोल्हे आणि त्यांच्या कुटुंबातर्फे मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ढोलताशांच्या गजरात आणि पुष्पवर्षावात मुख्यमंत्र्यांचे येथे स्वागत झाले. सौ. सरीताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांचे औक्षण केले. याप्रसंगी महापालिकेतील शिंदे गटाचे सर्व नगरसेवक आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर खोटे नगर येथे नगरसेवक मनोज चौधरी आणि ज्येष्ठ पदाधिकारी शाम कोगटा यांच्यातर्फे मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आधी पाळधी येथे जात असून त्यांच्या हस्ते नवीन शासकीय विश्रामगृहाचे उदघाटन आणि २२ कोटी रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ते मुक्ताईनगर शहरात आयोजीत करण्यात आलेल्या भव्य सभेला उपस्थिती लावणार आहेत.