⁠ 
शनिवार, जून 15, 2024

एकनाथ खडसेंनी रावेर तर अनिल पाटलांनी जळगाव लोकसभा लढविण्याचा राष्ट्रवादीचा प्रस्ताव, मात्र काँग्रेसची नाराजी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२३ । राज्यात जरी महाविकास आघाडी एक जुटीने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार असली तरी राज्यात जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात यासाठी प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा व जळगाव लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. रावेर मधून आमदार एकनाथ खडसे व जळगावमधून आमदार अनिल पाटील यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. मात्र यावरुन महाविकास आघाडीमध्ये धूसफूस होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा असल्याने येथून काँग्रेसचाच उमेदवार मैदानात उतरेल, अशी भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार जळगाव दौर्‍यावर असताना पक्ष नेत्याच्या बैठकित दोन्ही लोकसभा मतदारसंघांबाबत चर्चा झाली. रावेर लोकसभेसाठी आमदार एकनाथ खडसे यांना उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव जिल्ह्यातून देण्यात आला आहे. तर आमदार अनिल पाटील यांनी जळगाव लोकसभा लढवावी अशी शिफारस राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली आहे. जळगावमधून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नावाबाबतही चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप कोणतेही नाव निश्‍चित करण्यात आलेले नाही.

रावेर लोकसभा हा काँग्रेसचा मतदार संघ आहे. २०१९ मध्ये काँग्रेसतर्फे डॉ.उल्हास पाटील यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. २००९ व २०१४ वगळता हा मतदार संघ काँगेसच्या ताब्यात राहिला आहे. यंदाही या मतदार संघातून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील किंवा त्यांच्या कन्या डॉ.केतकी पाटील या रिंगणात उतरण्याची शक्यता असून त्या दृष्टीने काँग्रेसने तशी तयारी देखील सुरु केली आहे. मात्र आता या मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा केल्याने आता २०२४ मध्ये रावेर लोकसभा मतदार संघावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.