⁠ 
शनिवार, जून 15, 2024

चाळीसगाव तालुक्यातील ३००० भाविकांची केली पंढरीची वारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२३ ।  चाळीसगाव तालुक्यातील भाविकांना स्वखर्चाने दरवर्षी पंढरपूर नेण्याचे हे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे चौथे वर्ष… यावर्षी दि.२० जून ते २२ जून या तीन दिवसांच्या दरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वखर्चाने आरक्षित केलेल्या विशेष रेल्वे ने जवळपास ३००० भाविकांना त्यांनी पंढरीचे दर्शन घडविले. अतिशय चोख नियोजनात पार पडलेल्या या पंढरपूर वारी सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी काय ती वारी… काय ती स्पेशल रेल्वे… काय ती व्यवस्था… सगळ एकदम ओके..! म्हणत समाधान व्यक्त केले.

दरवर्षी धो धो बरसणाऱ्या पावसाने यावर्षी जून महिना संपत आला तरीदेखील हजेरी न लावल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या अजून बाकी आहेत. त्यामुळे या पंढरपूर वारीत विठ्ठलाला समाधानकारक पावसाचे व शेतकऱ्यांच्या सुख समृद्धीचे साकडे घालणार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले होते. चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे पंढरपूर वारी शुभारंभ सोहळा दि.२० जून रोजी संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता. तिथून चाळीसगाव रेल्वे स्टेशन पर्यंत पायी माउलींची पालखी आमदार मंगेश चव्हाण व सौ.प्रतिभाताई चव्हाण हे सपत्नीक नेणार होते. मात्र वारी सुरु झाल्यानंतर दोनच मिनिटात धो धो पाउस बरसू लागल्याने आमदार मंगेशदादांच्या वारीला वरुणराजाचा आशिर्वाद मिळाला अशी भावना सर्वांनी व्यक्त केली. तेथून पावसातच चाळीसगाव रेल्वे स्टेशन पर्यंत माउलींची पालखी हरिनामाच्या जयघोषात नेण्यात आली. यावेळी वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपा प्रदेश उपाध्यक्षा श्रीमती स्मिताताई वाघ, भाजपा जनजातीय आघाडी प्रदेश संयोजक किशोरभाऊ काळकर, पारोळा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करणदादा पाटील, जिल्हा दुध संघाचे संचालक रोहित पवार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वखर्चाने आरक्षित केलेल्या २२ डब्यांच्या विशेष रेल्वेने जवळपास ३००० भाविक दि.२० रोजी रात्री ८.५० वा. पंढरपूर कडे रवाना झाले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक बोगी ला ३ बोगीप्रमुख नेमण्यात आले होते. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वारकऱ्याला पाणी बोटल वाटप करण्यात आल्या. तसेच कुणाला प्रवासात काही त्रास झाल्यास प्राथमिक उपचारासाठी डॉक्टरांची टीम देखील कार्यरत होती. १२ तासांचा प्रवास करून ही “वारकरी एक्स्प्रेस” दि.२१ जून रोजी सकाळी १० च्या दरम्यान पंढरपूर रेल्वे स्थानकावर पोहोचली. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन, पंढरीचे अविरत वारकरी श्री.संजय दादा पवार व तालुक्यातील भाजपचे जेष्ठ पदाधिकारी यांनी तुळशीमाळ घालून व सुवासिनींनी औक्षण करून आमदार मंगेश दादा चव्हाण व त्यांच्या परिवाराचे व वारकऱ्यांचे पंढरपूर रेल्वे स्टेशन येथे स्वागत केले.


तद्नंतर सर्व वारकरी यांच्यासोबत आमदार चव्हाण यांनी मुक्कामाचे ठिकाण असणाऱ्या श्री शनी महाराज संस्थान मठ कडे प्रस्थान केले. तेथे सर्वांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांसोबत त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिराकडे रवाना झाले.

चाळीसगाव ते पंढरपूर प्रवासात आमदार मंगेश चव्हाण व सर्व सहकारी यांनी प्रत्येक बोगी मधील प्रवाश्यांची विचारपूस केली. कुणाला काही अडचणी असल्यास त्या तात्काळ मार्गी लावल्या. माऊली… सगळं व्यवस्थित शे ना… अशी अहिराणीत आपुलकीने आमदार आपली विचारपूस करत आहेत हे बघून वारकरी देखील भारावले. काही बोगीत सुरु असलेल्या भजनात आमदार मंगेश चव्हाण यांनीदेखील सहभागी होत टाळ मृदंगाच्या चालीत ठेका धरला. तसेच अनेक भाविकांनी आमदारांसोबत सेल्फी घेत हा संस्मरणीय प्रवास छायाचित्रात कैद केला.

दि.२१ रोजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वच वारकऱ्यांनी आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेत त्याचे सावळे रूप मनात साठवले होते. चाळीसगाव तालुक्यातील सर्वांच्या सुखसमृद्धीचे साकडे श्री विठ्ठलाला घातल्यानंतर आमदार मंगेश चव्हाणांसह सर्व वारकरी पंढरपूर रेल्वे स्टेशन येथे जमा झाले. मात्र रेल्वे च्या नियोजनाप्रमाणे गाडी रवाना होण्यासाठी दोन तासांचा अवकाश असल्यामुळे सर्वानी रेल्वे स्टेशन येथेच भजन, कीर्तन, भारुडे म्हणत हरिनामाचा गजर केला. त्याचवेळी भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल नागरे यांच्या निधनाची बातमी कळताच कार्यक्रम थांबविण्यात आला व त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.