⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | ९ गावांचा संपर्क तुटणार.. दळणवळणाची होणार गैरसोय?

९ गावांचा संपर्क तुटणार.. दळणवळणाची होणार गैरसोय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pachora News-जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२२ । पाचोरा ते तारखेडा दरम्यान रेल्वे प्रशासनाने तिसरी रेल्वेची लाईन टाकण्याचे काम हाती घेतले असून या कामामुळे रेल्वे लगतचा शिवकालीन रस्ता बंद करण्यात येणार असल्याचे समजते. सदर रस्ता बंद झाल्यास ९ गावांचा संपर्क तुटणार आहे. त्यामुळे शाळकरी मुलांसह दळणवळणाची खुप मोठी गैरसोय होणार आहे. दरम्यान, या गावातील ग्रामस्थांचे नुकसान होवु नये, म्हणून येथील नागरिकांनी आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थित उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्याकडे निवेदन दिले आहे.

तारखेडा बु”, तारखेडा खु”, चिंचखेडा, गाळण (हनुमानवाडी), गाळण बु”, गाळण खु”, गाळण (विष्णुनगर), चुंचाळे, नगरदेवळा आदि, गावांचा संपर्क तुटणार असून तालुक्याच्या गावाला जोडणारा रस्ता बंद होईल, त्यामुळे सदरील गावांचा दळणवळणाचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. भविष्यात आरोग्य सेवा वेळेत न मिळाल्यास जिवीत हानी सुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळकरी मुलांच्या प्रवासाला देखील यामुळे अडचण निर्माण होईल. ९ गावांमधून बहुसंख्य मुले – मुली पाचोरा येथे शिक्षण घेण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होऊ शकते. या गावांमधून दररोज हजारो लिटर दुध, शेतकऱ्यांचा शेतमाल तसेच अनेक बाबींच्या दळणवळणाची खुप मोठी गैरसोय होणार आहे.

दरम्यान, पाचोरा, तारखेडा व गाळण (रेल्वे लगतचा शिवकालीन) रस्ता बंद झाल्यास अनेक समस्यांना ९ गावातील ग्रामस्थांना सामोरे जावे लागणार आहे. सर्व ९ गावांचे रहिवासी यांच्या वतीने पाचोरा – तारखेडा (शिवकालीन) रस्ता संघर्ष समितीतर्फे तसेच आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थित उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्याकडे निवेदन देण्यात आले असून समस्यांचा सारासार विचार करून सदरची मागणी संबंधीत विभागास कळवुन रेल्वे रूळा लगतच नवीन जमिन अधिग्रहण करून पर्यायी रस्त्याची तात्काळ व्यवस्था करावी आणि शासन दरबारी न्याय मिळावा, लवकरात लवकर‌ शासनाकडून ठोस लेखी आश्वासन मिळावे अशा मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई – ३२. सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार, आमदार (पाचोरा) यांना पाठविण्यात आल्या आहेत.

या प्रसंगी तहसिलदार कैलास चावडे, निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, सेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, मा. जि.प सदस्य पदमसिंग पाटील, तालुका प्रमुख सुनिल पाटील, अनिल धना पाटील, प्रविण ब्राह्मणे, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील यांच्यासह संबंधित गावांचे सरपंच, ग्रा. पं. सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह