जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२२ । मी केलेल्या वक्तव्याचा कारण नसताना विपर्यास करून एका वृत्तवाहिनीने चुकीची बातमी दाखवली आणि शिवसेनेने माझ्या विरोधात आंदोलन केलं हे अतिशय दुर्दैवी असून याचा मी निषेध करतो असं राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
मी नुकताच केलेल्या भाषणाच्या विपर्यास करुन काटछाट करून चुकीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला जात आहे. मी केलेला विधान इतकाच होतं की आम्ही कोणतेही तज्ञ नसून आम्ही सर्वसामान्यांचे डॉक्टर आहोत. यामध्ये कोणत्याही व्यक्तीचा किंबहुना कोणत्याही डॉक्टरचा अपमान करण्याची गोष्ट नव्हती. मुद्दामून हे कृत्य करण्यात आले असून या विरोधात मी हक्क भंग आणणार आहे. असे गुलाबराव पाटील म्हणाले.
तर दुसरीकडे जळगाव शहरात झालेल्या आंदोलनामध्ये केवळ 22 लोक होते. यामुळे हे आंदोलन काही मोठं नसून एक साधा प्रयत्न होता. मात्र मी कोणतही चुकीचं विधान केलं नाहीये. मी आज पर्यंत कधीच कोणाबद्दलच इतका नीच विचार करूच शकत नाही असे गुलाबराव पाटील म्हणाले.
आज सायंकाळी शिवसेनेतर्फे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर तसेच महिलांचे अपमान करणारे वक्तव्य केल्याने युवासेना, शिवसेना व शिवसेना महिला आघाडी तर्फे नेहरू चौक जळगाव येथे निषेध करण्यात आला होता. यावर ते बोलत होते.