शिवसेनेला 13 मंत्रिपदे मिळणार; कोण-कोण घेणार शपथ? समोर आली यादी..
जळगाव लाईव्ह न्यूज । विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाले असून यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यांनंतर आता सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील मंत्रिपदांच्या तिढ्यामुळे हा विस्तार थांबला होता, परंतु आता ही तिढे दूर होत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेला महायुतीमध्ये 13 मंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिनसेनेच्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांच्या नावांवर दिल्लीत काल चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार महायुतीमध्ये शिवसेनेला 13 मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती आहे.
दोन तीन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार
14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त जवळपास निश्चित मानला जात आहे. या विस्तारात शिवसेनेला नगरविकास खाते मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदांसाठी बरेच दिवस भाजपला ताटकळत ठेवले होते, त्याचाच फायदा म्हणून शिंदे गटाच्या वाट्याला 13 ते 14 मंत्रिपदं येणार असल्याची माहिती आहे.
त्यात गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभुराज देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. तर भरत गोगावले यांचा शिंदेंच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश असणार असल्याची चर्चा वारंवार होत होती. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने ते मंत्री होऊ शकले नाहीत. आता फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात गोगावले यांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे.
दिल्लीतून शिक्कामोर्तब झालेल्या मंत्र्याची नावं
१) गुलाबराव पाटील
२) उदय सामंत
३) दादा भुसे
४) शंभूराजे देसाई
५) तानाजी सावंत
६) दीपक केसरकर
७) भरतशेठ गोगावले
८) संजय शिरसाट
९) प्रताप सरनाईक
१०) अर्जुन खोतकर
११) विजय शिवतारे
१२) प्रकाश सुर्वे
१३) आशिष जैस्वाल