जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२२ । शहरापासून जवळच असलेल्या एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देत एकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गावातील संशयित आरोपी साबीर शेख जहूर (वय-२६) याची अल्पवयीन मुलीशी ओळख होती. ओळखीचा आणि समाजात असलेल्या स्थानाचा फायदा घेत त्याने दि. १ ऑगस्ट २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान अल्पवयीन मुलीला घरी बोलाविले. संशयित साबीर शेख याने मुलीला त्याच्या घरी बोलावून पाण्यात गुंगीचे औषध देवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. हा प्रकार सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीने आपल्या नातेवाईकांसह एमआयडीसी पोलीसात धाव घेतली.

अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी संशयित आरोपी साबीर शेख जहूर याच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करीत आहे. दरम्यान, संशयिताची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून शनिवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीच्या शोरूमचे दिमाखात उद्घाटन; ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स
- रावेरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान किरकोळ दगडफेक; परिस्थिती नियंत्रणात
- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणेशोत्सव स्पर्धांतून संस्कृतीचा जागर
- सराफा बाजारात शनिवारी मोठी तेजी! सोने-चांदीत तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ?
- जळगाव रेल्वे स्थानकावरील कामाचा फटका; १२ गाड्या रद्द, अनेकांच्या वेळेत बदल










