जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । वन्यप्राण्यांकडून होणारी मानवी जिवीतहानी व पशुधन हानी यात नुकसानग्रस्तांना मिळण्यात येणाऱ्या मदतीत राज्य शासनाने वाढ केली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच विधानपरिषदेत याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना दिलासा मिळणार आहे.

वाघ,बिबट,अस्वल,तळस,कोल्हा,लांडगा,हत्ती,रानगवा, रानडुक्कर यासह इतर हिस्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना २० लाख भरपाई मिळणार आहे. त्यात १० लाख रुपयाचा धनादेशद्वारे तात्काळ मिळणार आहे. उर्वरीत रक्कम १० लाख रुपये राष्ट्रियकृत संयुक्त बॅक खात्यात दरमहा व्याजावर ठेव म्हणुन ठेवण्यात येणार आहे. तसेच कायमचे अपंगत्व आल्यास ५ लाख रुपये, गंभीर जखमी झाल्यास १ लाख २५ हजार रुपये, किरकोळ स्वरुपातील जखमींना उपचार खर्च, खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास २० हजार रुपये प्रती व्यक्ती अशी मदत मिळणार आहे.

त्याचप्रमाणे पाळीव पशुंचे नुकसान भरपाईतही वाढ केली असून गाय, म्हैस, बैल यांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यु झाल्यास ७० हजारापर्यत मदत मिळणार आहे. जनावरांना कायम अपंगत्व आल्यास १५ हजार तसेच शेळी, मेंढी मृत पावल्यास १५ हजार,पशु जखमी झाल्यास ५ हजाराची मदत मिळणार आहे. तसेच राज्यातील अनेक भागात रानगव्यासह वन्यप्राण्यांकडुन होणाऱ्या शेतीपीक नुकसान लक्षात घेता याबातही विचार करण्यात येणार आहे.












