जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । भडगाव शहरासह तालुक्यात गिरणा नदी पात्रातून अवैधरीत्या वाळू चोरीचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारींची येथील महसूल व पोलिस प्रशासनांनी दखल घेतली असून कारवाईचा बडगा उगारला आहे. १७ रोजी रात्री वडधे गावाजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे ५ ट्रॅक्टर पकडण्यात आले. तर १५ रोजी रात्री खेडगाव खुर्द रस्त्यावरही ट्रॅक्टर पकडून कारवाई केली. असे एकूण ६ ट्रॅक्टर पकडून येथील तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. यापुढेही अशी कारवाई पथकामार्फत सुरुच राहील, अशी माहिती येथील तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी दिली. दरम्यान या कारवाईमुळे अवैध वाळू चोरट्यांचे धाबे दणाणले आहे.
रविवारी कारवाईवेळी निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर, तलाठी व्ही.सी. पाटील, व्ही.पी. शिंदे, पवन शेलार, प पी.के. पाटील, राहुल पवार, पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोलिस काॅन्स्टेबल स्वप्नील चव्हाण, पोलिस हेड काॅन्स्टेबल विलास पाटील, वाहनचालक राजू पाटील यांचा तर शुक्रवारी खेडगाव खुर्द येथील कारवाईत निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर, तलाठी व्ही.सी. पाटील, राहुल पवार यांचा समावेश हाेता. या ६ ट्रॅक्टरधारकांना प्रत्येकी १ लाख २५ हजार १७३ रुपये दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली. तालुक्यात १ एप्रिल २०२१ ते आतापर्यंत एकूण ६६ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर महसूल प्रशासनाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून एकूण ९० लाखांपैकी ६९ लाख ८९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर उर्वरीत एकूण ९ वाहने न्यायालयीन प्रक्रियेत असल्याची माहिती महसूल विभागाचे लिपीक संदीप बढे यांनी दिली.
भडगाव शहर परिसरासह तालुक्यात सध्या गिरणा व तितुर नद्यांच्या पात्रांमधून बिनधास्त अवैध वाळू चोरी सुरू आहे. तसेच तालुक्यात मुरुम, माती, डबर चोरीचेही प्रमाण वाढले आहे. विना परवानगी मुरुम, माती, डबर वाहतूक करताना नेहमी वाहने नजरेस पडतात. याकडेही महसूल प्रशासनाचे सध्या दुर्लक्ष झाले आहे. अवैध वाळू चोरी व मुरुम, माती, डबर विनापरवाना वाहतुकीवर आळा बसवून कठाेर कारवाईची नागरिकांची मागणी आहे.