जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । तरूणाला चाकूचा धाक दाखवत मोबाईलसह रोकड लांबविल्याची घटना शहरातील महामार्गावरील हुंडाई शोरूमजवळ समोर घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अनुभव सौरभ नायक (वय-२६) रा. शिव कॉलनी, जळगाव हा तरूण मार्केटींग डायरेक्टर म्हणून काम करीत आहे. बुधवारी ६ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजेया दरम्यान अनुभव नायक हा राष्ट्रीय महामार्गावरील हुंडाई शोरूमजवळून जात असतांना त्याच्या जवळ अज्ञात दोन जण दुचाकीवर आले. यातील दुचाकीच्या मागे असलेल्या एकाने अनुभवला चाकूचा धाक दाखविला आणि खिश्यातील १० हजाराचा मोबाईल आणि ७०० रूपयांची रोकड असा एकुण १० हजार ७०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हिसकावून नेला. घटना घडताच अनुभव नायक याने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून अज्ञात दोन जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहेत.











