⁠ 
रविवार, मे 19, 2024

बाजार समितीत बनावट पावतीने फसवणूक; काेर्ट उठेपर्यंत आरोपीला कैदेची शिक्षा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२२ । कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावाने बनावट व जुनी पावती देत, फसवणूक करणाऱ्या आरोपी विरुध्द गुन्हा सिद्ध झाल्याने येथील मुख्य प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टाने आरोपीस दोषी धरुन त्याला कोर्ट उठेपर्यत साध्या कैदेची व दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

भडगाव पेठ चौकात सार्वजनिक ठिकाणी २ मार्च २०१२ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अतिकुर रहेमान जान महंमद अंन्सारी याने त्याच्या ताब्यातील कापसाने भरलेला ट्रक (एमएच- १८, एम- ६५०८) घेवून जात हाेता. त्याने बाजार समितीच्या पावतीचे पैसे न भरता भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावाने असलेली बनावट व जुनी पावती दिली. ही पावती बाजार समितीचे कर्मचाऱ्यांना दाखवून त्याने कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा यांची ३१३ रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद बाजार समितीचे कनिष्ठ लिपिक हिंमत रघुनाथ देशमुख यांनी दिली हाेती. या प्रकरणी भडगाव पाेलिस ठाण्यात कलम ४२० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही. बी. काझी यांनी केला हाेता. या खटल्यात सरकार पक्षातर्फे ५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. सरकारी वकील व्हि. डी. मोतीवाले यांनी सरकारतर्फे युक्तिवाद केला.
दरम्यान, आराेप सिद्ध झाल्याने मुख्य प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. खराटे यांनी कलम ४२० अन्वये संबंधित आरोपीस कोर्ट उठेपर्यंत साध्या कैदेची व रुपये २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंडाची रक्कम न भरल्यास २ दिवसांची साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे.