जळगाव लाईव्ह न्यूज । नितीन ठक्कर । दुकानावरून घराकडे परतणार्या सराफा व्यावसायिकाला रस्त्यात गाठत दरोडेखोरांनी मारहाण करीत त्याच्याकडील चार किलो चांदीसह, दुचाकी व मोबाईल मिळून सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल लांबवण्यात आल्याची घटना दि.१६ रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास एरंडोल शहराजवळील चोरटक्के गावाजवळ घडली.
माळपिंप्री येथील रहिवासी असलेले सराफा व्यावसायीक राजेंद्र बबनशेठ विसपुते यांचे एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे समर्थकृपा नावाचे सराफा दुकान आहे. सकाळी नऊ वाजता दुकान उघडल्यानंतर दुपारी दोन वाजता ते दुकान बंद करून मूळ गावी माळपिंप्री येथे जातात. त्यांच्या दिनचर्येवर लक्ष ठेवून २५ ते ३० वयोगटातील अज्ञात तरुणांनी चोरटक्के गावापासून एक किलोमीटर अंतरावर बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास राजेंद्र विसपुते यांच्या दुचाकीपुढे त्यांच्या दोन दुचाकी लावून अडवत काही कळण्याच्या आत विसपुते यांना मारहाण सुरू केली व त्यांच्याकडील दागिण्यांचा ऐवज असलेली बॅग हिसकावली.
विसपुते यांच्या बॅगेत १५० ग्राम सोने, चार किलो चांदी, ५२ हजारांची रोकड तसेच मोबाईल असा सुमारे नऊ लाखांचा ऐवज होता. चोरट्यांनी लुटबकरण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे काळ्या कापडाने बांधून झाकल्याने त्यांची ओळख पटली नव्हती. ऐनवेळी लूट झाल्यानंतर चोरट्यांकडील दुचाकी जागेवरच बंद झाल्याने त्यांची पंचाईत झाली मात्र चोरट्यांनी विसपुते यांची दुचाकी हिसकावून त्याद्वारे पळ काढला. या प्रकारानंतर विसपुते यांनी एरंडोल पोलिसात धाव घेत पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्याकडे आपबिती कथन केली.
घटनेचे गांभीर्य ओळखत जिल्ह्यात अलर्ट जाहीर करण्यात आला असून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी एरंडोल पोलीस ठाण्याला भेट देत घटना जाणून घेत तपासाबाबत मार्गदर्शन केले. दरम्यान, घटनास्थळावरून चोरट्यांची दुचाकी जप्त करण्यात आली असून त्याद्वारे चोरट्यांचा शोध लागण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत पायी जाणाऱ्या तरुणाचा मृत्यू
- भयकंर! जळगावात चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविलं जीवन
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू
- Breaking : जळगावात निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात