⁠ 
सोमवार, मे 6, 2024

रस्त्यांच्या कामानंतर नळ कनेक्शन घेतल्यास दुप्पट शुल्क आकारणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२२ । महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली आहे; परंतु अनेक ठिकाणी नळजाेडणी न झाल्याने रस्त्यांचे खाेदकाम हाेण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात प्रशासन व सत्ताधाऱ्यांत खल सुरू आहे. यावर पर्याय म्हणून रस्त्यांच्या कामांनंतर नळजाेडणी करणाऱ्या मालमत्ता धारकांकडून जाेडणीसाठी दुप्पट शुल्क आकारले जाऊ शकते. तसा प्रस्ताव तयार केलेला आहे.

अमृत अभियानात पाणीपुरवठा याेजनेचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे आले आहे. एप्रिल अखेर नवीन जलवाहिनीतून पाणीपुरवठा शक्य आहे. दरम्यान, संपूर्ण शहरात नवीन जलवाहिनी टाकण्यात आली असून, त्यावरून नळकनेक्शन देण्याचे काम सुरू आहे. मात्र, असे असले तरी अजूनही सुमारे १५ हजार नागरिकांनी नळजाेडणी करून घेतलेली नाही. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद न देता मालमत्ता धारकांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे सांगितले जात आहे. पूर्वी मालमत्ता कराचा भरणा करणे सक्तीचे हाेते; परंतु आता पैसे भरण्याची सूचना करून कनेक्शन दिले जात आहेत.

रस्त्याचे काम हाेण्यापूर्वीच कनेक्शन घेणे ठरेल याेग्य

शहरात नवीन रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. शहराच्या सर्वच भागात डांबरीकरणाचे काम सुरू हाेणार आहे. त्यामुळे एकदा डांबरीकरणाचे काम झाल्यावर पुन्हा नळ कनेक्शनसाठी खाेदकाम झाल्यास रस्ता खराब हाेणार आहे. त्यामुळे नागरिकांनी डांबरीकरणानंतर नळजाेडणीसाठी खाेदकाम केल्यास संबंधितांकडून दुप्पट खर्च वसूल केली जाण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा :