रोजगाराच्या नावाखाली आदिवासी बांधवांची फसवणूक

ऑक्टोबर 24, 2021 1:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | २३ ऑक्टोबर २०२१ | यावल तालुक्यातील गरीब आदिवासींना ऊसतोड कामगार म्हणून रोजगार देण्याच्या नावाखाली त्यांची फसवणूक व शोषण करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून याला वेळीच आळा घालण्याची मागणी होत आहे.

प्रतीकात्मक छायाचित्र jpg webp

राज्यातील विविध विभागातील साखर कारख्यान्यांच्या गळीत हंगामाला सुरूवात होत आहे. या कारखान्यांवर उस वाहतुकीसाठ लागणारे मोठ्या प्रमाणावर मजुर लागत असल्याने हे मजूर यावल तालुक्यातुन तसेच विविध ठिकाणाहुन नेले जातात. या रोजगार मिळवून देण्याच्या नावाखाली गोरगरिब महिला व पुरुष आदीवासी बांधवांची फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. दरम्यान, याविषयावर आदीवासी समाजसेवी संघटनांनी पुढाकार घेवुन अशा प्रकारे कारखानदारीच्या नावावर उसतोड मजुरी देण्याच्या आमिषाखाली होणार्‍या गैरप्रकारांना वेळीच बंदी घालावी, अशी मागणी होत आहे.

यावल तालुका हा आदीवासी क्षेत्र म्हणुन ओळखला जातो. तालुक्यातील बहुतांश गाव हे सातपुडा पर्वताच्या कुशीत तर काही गावे हे पायथ्याशी आहेत. यात आदीवासी बांधवांची लोकसंख्या मोठी आहे. त्यांची गरिबी आणि बेरोजगारीचा गैरफायदा घेत याच परिसरातील काही दलालांच्या माध्यमातुन मराठवाडा विभागातुन काही साखर कारखान्यांचे दलाल हे संगनमताने त्यांना आमीष दाखवितात. स्वत:चे आर्थिक हित साध्य करण्यासाठी गोरगरीब आदीवासी वाडया वस्तींवर अशा दलालांच्या मध्यस्थीने जावुन त्यांना मोलमजुरी देण्याच्या नावावर त्यांची ट्रक व इतर वाहनाव्दारे मराठवाडा व इतर ठिकाणी सुरू होणार्‍या साखर कारखान्यांच्या ठीकाणी गुराढोरांसारखे भरून पाठवण्यात येते.

अशा प्रकारे कारखानदारीच्या गळीत हंगामाच्या नावाखाली आदीवासी मजुरांची कुणालाही अधिकृतरित्या सुचना किंवा नोंदणी न करता मजुरी देण्याच्या नावाखाली आदीवासी गोरगरीब लोकांची आर्थिक व मानसिक फसवणुक करण्यात येत असते. यात अनेक आदिवासी बांधवांची फसवणूक होत आहे. या गंभीर विषयाकडे जागृत आदीवासी समाजसेवी संघटनांनी लक्ष वेधून हा प्रकार थांबवावा, अशी मागणी केली आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now