जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१ । मागील काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. देशभरात आज रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात प्रत्येकी ३५ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे जळगावात पेट्रोल प्रति लिटर ११३ रुपयांवर गेले आहे. तर डिझेल प्रति लिटर १०२ रुपयांवर गेले आहे.

देशभरात आधीच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडली आहे. गॅस दरवाढीने किचन बजेट कोलमडून गेले आहे. त्यात सततच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने सामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच १२० रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ऑक्टोबर महिन्यात १३ वेळा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. या काळात पेट्रोल ३.८५ रुपयांनी तर डिझेल प्रतिलीटरमागे ४.३५ रुपयांनी महाग झाले आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर ९० डॉलर्स प्रतिबॅरल इतके होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आणखी वाढ होऊ शकते.












