वरणगावात भाजप-माविआ समोरासमोर, दोन्ही गटात जोरदार राडा

ऑक्टोबर 14, 2021 1:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२१ । वरणगावात महाराष्ट्र बंदवरून महाविकास आघाडी व भाजपा पदाधिकारी समोरा-समोर आल्यानंतर शाब्दीक वाद धक्काबुक्कीवर गेल्यानंतर शहरासह तालुक्यात खळबळ उडाली. हाणामारीत माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह दोघा बाजूचे काही कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

new 20

दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते रुग्णालयात दाखल
भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात बंदला सोमवारी गालबोट लागल्याने खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर तुफान हाणामारी झाली. या घटनेनंतर दोन्ही पक्षाचे काही कार्यकर्ते जखमी झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते शांततेत पाळण्याचे आवाहन करत असताना भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दोन वर्षांपासून व्यापारी आधीच अडचणीत असताना आता पुन्हा बंद पाळू नका, दुकाने सुरू ठेवा, असे आवाहन व्यापार्‍यांना करीत होते. या दरम्यान दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरा-समोर आल्याने शाब्दीक वाद वाढत गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

मारहाण केली नाही : राजेंद्र चौधरी
अत्यंत शांततेच्या मार्गाने व्यापार्‍यांना दुकाने बंद करण्यासाठी विनंती करण्यात आली. तत्पूर्वी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष आदींना पत्रदेखील दिले होते. सोमवारी सकाळी काही दुकाने उघडी असल्याने हात जोडून विनंती करीत असताना माजी नगराध्यक्ष सुनील काळे व कार्यकर्त्यांनी आमच्याच कार्यकर्त्यांना मारहाण केली. सुनील काळे यांनी अनेक आंदोलने केली त्या आंदोलनाला आम्ही कधीही प्रतिउत्तर कधीही दिलेले नाही. व्यापार्‍यांना आम्ही धमकावल्या असल्यास सिद्ध करावे.राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दीपक मराठे व कार्यकर्त्यांना धक्काबुक्की, जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. शहर विकासाची तळमळ आम्हालाही आहे त्यामुळे आम्हीदेखील शहर हितासाठी गुन्हे दाखल करणार नाही, असे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा गटनेते राजेंद्र चौधरी म्हणाले.

दुकाने बंद करण्यासाठी दडपशाही : सुनील काळे
अल्पसंख्यांक आघाडीचे डॉ.सादीक यांनाही सर्वात आधी मारहाण झाली मात्र आम्ही शांतता राखली. व्यापार्‍यांनी आपल्याला फोन करून दडपशाही बद्दल तक्रार केल्याने त्यांना धीर देण्यासाठी काही कार्यकर्त्यांसह बाहेर पडलो. कोरोनामुळे आधीच व्यापारी उद्ध्वस्त झाला असून घटना उत्तरप्रदेशात घडल्यानंतर वरणगावात दुकाने बंद करण्याचे कारण नव्हते. राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुधाकर जावळे व राजेंद्र चौधरी यांनी चिथावणी दिल्यानंतर आपल्यासह पाच कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली.

शहराचा विकास यांना पाहवला जात नाही मात्र जनता भाजपाच्या बाजूने आहे. शहरात शांतता टिकून रहावी म्हणून आम्ही सुडाचे राजकारण न करता गुन्हे दाखल न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे माजी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now