जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२१ । रावेर शहरात नकली नोटा चलनात आणणारे रॅकेट रावेर पोलिसांनी उधळून लावले आहे. रावेर पोलीस ठाण्यात मध्यरात्री पाच जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे. यामुळे नजीकच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सचिन रघुनाथ घुगे यांनी दिली आहे.संशयित आरोपी असलम उर्फ राजू सुपडू तडवी (वय ३० वर्षे, रा पाच बीबी टेकडी रावेर), सोनू मदन हरदे ( वय ३०वर्षे, रा अफुल्ली रावेर), रविंद्र राजाराम प्रजापति (वय ३१ वर्षे रा कुंभार वाडा, रावेर) , शेख शाकीर शेख साबीर ( वय 26 रा खाटीक वाडा, रावेर), शेख शकीर शेख हाफिज ( रा मदिना कॉलनी, रावेर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. १०० व २०० रुपयांच्या नकली, बनावट भारतीय चलनी नोटा रावेर शहरात आणून त्या संशयित आरोपी शेख शकीर शेख हाफिज याने अन्य चार संशयित आरोपींना चलनात आणण्यासाठी दिल्या.त्या नोटा नकली असल्याचे माहिती असूनही चौघांनी त्या तील काही नोटा चलनात आणून खर्च केल्या आहेत. पोलिसांनी चौघांच्या घेतलेल्या अंगझडतीत ७ हजार रुपयांच्या नकली नोटा मिळून आल्या आहेत. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे हे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.