अवैध वाळू साठा आढळल्याप्रकरणी ठेकेदाराला तब्बल ६० लाखाच्या दंडाची नोटीस

जुलै 6, 2021 12:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जुलै २०२१ । शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांच्या तक्रारी आणि पाठपुराव्यामुळे शासनाने वाळू वाहतूकदाराला तब्बल ६० लाख ७२ हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे. मेहरूण परिसरात ३०० ब्रास अवैध वाळू साठा आढळल्याप्रकरणी गुप्ता यांनी तक्रार केली होती.

valu

याबाबत वृत्त असे की, मेहरूण शिवारातील रहिवासी असलेले बाळू नामदेव चाटे हे वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतात. त्यांच्या सर्व्हे क्रमांक २५३ प्लॉट क्रमांक ६० येथील निवासस्थानाजवळ ऑगस्ट २०१८ मध्ये मोठा वाळूसाठा असल्याचे दिसून आले होते. या प्रकरणी मेहरूणच्या तलाठ्यांनी पंचनामा केला होता. मात्र या पंचनाम्यात विसंगती असल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी महसूल खात्याकडे २१ नोव्हेंबर २०२० रोजी तक्रार केली होती.

यानंतर या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यात आली. यात हा वाळू साठा बाळू नामदेव चाटे यांचाच असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या चौकशीत संबंधीत साठा हा ३०० ब्रास इतका असल्याने शासकीय नियमानुसार मूल्याच्या पाच पटीने दंड ठोठावण्यात आला. याला स्वामीत्वधनाची जोड दिली असता हा दंड तब्बल ५५ लाख २० हजार इतका होतो. यावर गौणखनिजाचाच्या रॉयल्टीचे १० टक्के मूल्य लावल्यानंतरची रक्कम ही ६० लाख ७२ हजार इतकी होते. बाळू चाटे यांना याच रकमेचा दंड ठोठावण्यात आल्याचे तहसीलदारांनी बजावलेल्या नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यांना ही नोटीस काल ५ जुलै रोजी बजावण्यात आली असून तीन दिवसांत यावर उत्तर देण्याचे नमूद करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now