
जळगाव लाईव्ह न्यूज । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर अमळनेरहून सुरतकडे जाणारी प्रवासी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. नवापूर शहरालगतच्या नोव्हेहोंडा-करंजी चौकात झालेल्या या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. मात्र, कारमधील एअरबॅग वेळेवर उघडल्याने चालकाचे प्राण थोडक्यात बचावले. बसमधील सुमारे ३० प्रवासीही सुखरूप असल्याने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, MH 20 PL 2942 क्रमांकाची प्रवासी बस अमळनेरहून प्रवाशांना घेऊन सुरतकडे जात होती. त्याचवेळी GJ 26 AE 8067 क्रमांकाची कार गडदून येथून नवापूरच्या दिशेने जात होती. दोन्ही वाहने नोव्हेहोंडा-करंजी चौकाजवळ आली असता त्यांच्यात जोरदार धडक झाली.
धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातात कारचालकाच्या डोक्याला मार लागल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, धडकेच्या वेळी एअरबॅग उघडल्याने त्याला गंभीर दुखापत होण्यापासून संरक्षण मिळाले.
बसमधील ३० प्रवासी बचावले
या अपघातात बसमधील सुमारे ३० प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच नवापूर वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांची पाहणी करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी कार्यवाही केली. काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता.





