
नवीन कपडे, शूज अन् मिठाई देत फुलविला चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद!
जळगाव लाईव्ह न्यूज । समाजातील वंचित घटकांप्रती संवेदनशीलता आणि माणुसकी जपणारा एक स्तुत्य उपक्रम जळगावात राबविण्यात आला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या शासकीय निवासस्थानी डंपिंग ग्राउंड परिसरात राहणाऱ्या तसेच कचरा वेचून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांतील लहान मुलांना विशेष निमंत्रित करण्यात आले. यावेळी मुलांना नवीन कपडे, शूज आणि मिठाईचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची कन्या सानिका धिवरे आणि मुलगा अर्णव श्रीकांत धिवरे यांच्या पुढाकारातून या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डंपिंग ग्राउंड परिसरातील प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या कुटुंबांतील मुलांना शासकीय निवासस्थानी बोलावून त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालविण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः मुलांशी संवाद साधला. त्यांच्या शिक्षणाची परिस्थिती, कौटुंबिक अडचणी आणि भविष्यातील स्वप्नांविषयी त्यांनी आस्थेने विचारपूस केली. तसेच मुलांना नवीन कपडे, शूज आणि मिठाई भेट देत त्यांचा आनंद द्विगुणित केला.
सामान्यतः समाजाच्या नजरेपासून दूर राहणाऱ्या या मुलांना सन्मानाने वागणूक देत त्यांच्यासोबत आनंद वाटून घेण्याचा हा प्रयत्न विशेष ठरला. केवळ वस्तूंचे वाटप न करता मुलांच्या भावना समजून घेणे, त्यांच्या स्वप्नांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, हा या उपक्रमामागील सकारात्मक संदेश आहे.
सानिका आणि अर्णव यांच्या पुढाकारातून झालेल्या या उपक्रमाचे कौतुक होत असून, माणुसकी, सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलतेचा आदर्श समाजासमोर ठेवणारा हा उपक्रम ठरला आहे.





