रेल्वेभुसावळ

दिवाळी-छठपूजेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय! भुसावळ विभागातून ८२ हून अधिक विशेष गाड्या

जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळी आणि छठपूजेच्या निमित्ताने रेल्वे प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून ८२ हून अधिक विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. यामध्ये उधना-झंझारपूर, उधना-मधुबनी या विशेष गाड्यांसह भुसावळ-देवळाली मेमूचाही समावेश आहे. या निर्णयामुळे जळगावसह खान्देशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सणांच्या काळात विशेषतः उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. ही गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर प्रवाशांची सुरक्षितता आणि स्थानकांवरील गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रमुख स्थानकांवर रेल्वे सुरक्षा दलाचे अतिरिक्त जवान तसेच कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

उधना-झंझारपूर विशेष गाडीच्या चार फेऱ्या

उधना-झंझारपूर (०९०७५/०९०७६) अनारक्षित विशेष रेल्वे ९ ते १२ नोव्हेंबरदरम्यान धावणार आहे. उधना येथून ही गाडी सकाळी ११.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ११.३० वाजता झंझारपूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ११ ते १४ नोव्हेंबरदरम्यान झंझारपूर येथून सकाळी ६.३० वाजता गाडी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता उधना येथे पोहोचेल.

उधना-मधुबनी गाडीला नंदुरबार, भुसावळला थांबा

उधना-मधुबनी (०९०३५/०९०३६) विशेष रेल्वे ९ आणि १२ नोव्हेंबर रोजी उधना येथून सकाळी ८.३५ वाजता रवाना होईल. दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजता ती मधुबनी येथे पोहोचणार आहे. परतीची गाडी ११ आणि १४ नोव्हेंबर रोजी मधुबनी येथून सकाळी ६.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता उधना येथे दाखल होईल.

या गाडीला चलथान, बारडोली, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर, मुझफ्फरपूर आणि समस्तीपूर या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे नंदुरबार आणि भुसावळ परिसरातील प्रवाशांना उत्तर भारताच्या दिशेने प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे.

भुसावळ-देवळालीदरम्यान विशेष मेमू

दिवाळी आणि भाऊबीजेच्या काळात स्थानिक प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी भुसावळ-देवळालीदरम्यान १० आणि ११ नोव्हेंबर रोजी विशेष अनारक्षित मेमू चालविण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०९०७२ भुसावळ येथून सकाळी ९.१५ वाजता सुटून दुपारी १.०५ वाजता देवळाली येथे पोहोचेल. तर परतीची गाडी क्रमांक ०१०७१ देवळाली येथून दुपारी १.३० वाजता रवाना होऊन सायंकाळी ५ वाजता भुसावळला पोहोचणार आहे.

या मेमूला जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव आणि नाशिक रोड येथे थांबे असतील. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना सणासुदीच्या काळात प्रवासाचा अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार आहे.

मुंबई-पुण्यासह अनेक मार्गांवर विशेष रेल्वे

भुसावळ विभागातून मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर, अमरावती-उधना, अमरावती-पुणे, मुंबई-गोरखपूर, मुंबई-दरभंगा, मुंबई-बनारस, पुणे-दानापूर आणि पुणे-गोरखपूर या मार्गांवरही विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत.

दिवाळी आणि छठपूजेच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या आणि सुरक्षा व्यवस्थेवर भर दिला आहे. त्यामुळे सणासाठी गावी जाणाऱ्या तसेच परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या नियोजनाचा फायदा होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button