
जळगाव लाईव्ह न्यूज । मागील काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली थंडी आता जळगावकरांना जाणवू लागली आहे. रात्रीच्या तापमानात घट झाल्याने शहरात गारठा वाढला असून, पहाटे आणि रात्री थंडीचा अनुभव येत आहे. मात्र, दिवसा उन्हाचा चटका कायम असल्याने जळगावकरांना एकाच दिवसात उन्हाळा आणि हिवाळा अशा दोन्ही ऋतूंचा अनुभव घ्यावा लागत आहे.
दिवाळीच्या दिवशी म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी जळगावचे कमाल तापमान ३४.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर किमान तापमान १४ अंशांपर्यंत घसरले. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमान १४ अंशांवर कायम राहिल्याने रात्रीच्या गारठ्यात वाढ झाली आहे.
हवामानातील या बदलांमुळे नागरिकांना एकाच दिवसात उन्हाळा आणि हिवाळा अशा दोन्ही ऋतूंचा अनुभव येत आहे. कमाल तापमान सरासरीपेक्षा १.२ अंशांनी अधिक नोंदवले गेले, तर किमान तापमान सरासरीपेक्षा १.७ अंशांनी कमी राहिले. त्यामुळे दिवसा उष्णता आणि रात्री थंडी असे परस्परविरोधी वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात पावसाची कोणतीही नोंद झालेली नाही. हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही कमी होत असून, सकाळी साडेआठ वाजता ६५ टक्के असलेली आर्द्रता सायंकाळी साडेपाच वाजता ३४ टक्क्यांवर आली. त्यामुळे वातावरणातील कोरडेपणा वाढत असल्याचे चित्र आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी पावसाची चिन्हे नसून, दिवसा उन्हाचा प्रभाव आणि रात्री थंडीचा कडाका असेच वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे.





