
जळगाव लाईव्ह न्यूज । यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्ताकारणात बदल झाला असून, नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. सभापतीपदाची जबाबदारी उमेश प्रभाकर पाटील यांच्याकडे, तर उपसभापतीपदाची धुरा पंकज दिनकर चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. आज ४ नोव्हेंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सर्वसाधारण सभेत दोघांचीही सर्वानुमते निवड करण्यात आली. महायुतीमध्ये ठरलेल्या राजकीय समीकरणानुसार या निवडी पार पडल्या.
यावल बाजार समितीतील नेतृत्वबदलाची प्रक्रिया विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे सुरू झाली होती. तत्कालीन सभापती उज्जैनसिंग भाऊलाल राजपूत आणि उपसभापती दीपक नरोत्तम चौधरी यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. महायुतीतील सर्व घटकांना नेतृत्वाची संधी मिळावी आणि सभापतीपदाचा सन्मान सर्वांना मिळावा, या भूमिकेतून त्यांनी पद सोडल्याचे सांगण्यात आले.
यानंतर आज ४ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता बाजार समितीच्या सभागृहात नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक झाली. अध्यासी अधिकारी कुणाल सोनार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रक्रियेला बाजार समितीचे सचिव स्वप्नील सोनवणे उपस्थित होते. बैठकीत सभापतीपदासाठी उमेश प्रभाकर पाटील आणि उपसभापतीपदासाठी पंकज दिनकर चौधरी यांच्या नावांवर एकमत झाले.
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीचे १९ संचालक आहेत. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीपूर्वी भालोद येथे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची आणि संचालकांची बैठक झाली होती. या बैठकीत उमेश पाटील आणि पंकज चौधरी यांच्या नावांवर सहमती झाली. त्यानंतर सर्वसाधारण सभेत दोघांची निवड निश्चित करण्यात आली.
या निवडीमुळे यावल बाजार समितीच्या कारभाराची जबाबदारी आता नव्या पदाधिकाऱ्यांकडे आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचा पुढील कारभार कसा चालतो, याकडे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष राहणार आहे.





