
जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे दुष्काळाने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात असताना त्यातच शेतकऱ्याकडून लाच घेतल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यावर कूपनलिकेची नोंद करण्यासाठी १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आमोदा (ता.यावल) येथील तलाठ्याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. शैलेश झोटे असं लाचखोर तलाठ्याचे नाव असून या कारवाईमुळे यावल तालुक्यातील महसूल विभागात खळबळ उडाली.
तक्रारदार शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यावर कूपनलिकेची नोंद करायची होती. यासाठी संबंधित काम करून देण्याच्या मोबदल्यात तलाठी शैलेश झोटे यांनी पैशांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. शेतकऱ्याने या प्रकाराची माहिती जळगाव एसीबीकडे दिल्यानंतर पथकाने तक्रारीची पडताळणी केली.
पडताळणीदरम्यान लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने सापळ्याची तयारी केली. चर्चेनंतर १ हजार रुपयांवर तडजोड ठरली. त्यानुसार तक्रारदाराला ठरलेल्या ठिकाणी रक्कम घेऊन जाण्यास सांगण्यात आले.
मंगळवारी आमोदा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ तक्रारदार आणि तलाठी झोटे यांची भेट झाली. यावेळी झोटे यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. घटनास्थळी केलेल्या कारवाईनंतर संबंधित कागदपत्रे व इतर बाबींची तपासणी करण्यात आली.
दुष्काळी परिस्थितीत लाचेच्या प्रकाराने संताप
जळगाव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना शेतकऱ्यांना महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी लाच द्यावी लागत असल्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी एसीबीकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे आणि त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणाच्या तपासात आणखी काही बाबी समोर येतात का, याकडे लक्ष लागले आहे.





