
जळगाव लाईव्ह न्यूज । यावल शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत पतीने अवघ्या २० वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या केली. आयेशा नगर परिसरातील तिरुपती नगरात ही घटना घडली असून मशीराबी फरदीन खान (वय २०) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून हत्येनंतर घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या आरोपी पती फरदीन खान आरिफ खान (वय २१) याला पोलिसांनी साकळी गावाजवळ पकडले. या घटनेने यावल शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फरदीन खान आणि मशीराबी खान हे तिरुपती नगर परिसरात वास्तव्यास होते. सोमवारी घरातील अन्य सदस्य एका लग्नसमारंभासाठी बाहेर गेले होते. याचवेळी घरात पती-पत्नी दोघेच असताना त्यांच्यात वादाला सुरुवात झाली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने हा वाद अधिकच चिघळला.
संतापलेल्या फरदीनने पत्नीच्या छातीवर बसून तिचा गळा आवळला. यात मशीराबी यांचा मृत्यू झाला. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी फरदीन घरातून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या फरदीनला साकळी गावाजवळ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अवघ्या वर्षभरापूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या या दाम्पत्याच्या संसाराचा अशा दुर्दैवी पद्धतीने अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत.





