भडगाव

जिल्हा परिषदेच्या CEO करिश्मा नायर यांची भडगाव तालुक्यात क्षेत्रीय भेट

जलतारा उपक्रमाचे उद्घाटन, गोट फार्मची पाहणी

जळगाव लाईव्ह न्यूज । जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी ३ नोव्हेंबर रोजी भडगाव तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी जुवार्डी येथे जलतारा उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती दिली, तर गुढे येथील ५००+२५ क्षमतेच्या सोजत गोट फार्मची पाहणी केली. यासोबतच तालुक्यातील चारा उपलब्धता, पशुसंवर्धन विभागाच्या योजना आणि संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

जुवार्डी येथे जलतारा उपक्रमाचे उद्घाटन

भडगाव तालुक्यातील जुवार्डी येथे जलतारा उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर उपस्थित होत्या. यावेळी जलतारा योजनेचे संस्थापक वायाळ यांनी उपक्रमाची माहिती दिली. जलसंधारण, भूजल पातळीत वाढ आणि पावसाच्या पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी जलतारा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. ग्रामस्थांनी लोकसहभागातून अशा उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहनही करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन जुवार्डी गावचे पी. ए. पाटील आणि रोजगार सेवक भूषण पाटील यांनी केले होते. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के. बी. अंजने, अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

५००+२५ सोजत गोट फार्मची पाहणी

यानंतर करिश्मा नायर यांनी गुढे येथील राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत उभारण्यात आलेल्या ५००+२५ क्षमतेच्या सोजत गोट फार्मला भेट दिली. या प्रकल्पाची माहिती जाणून घेत त्यांनी शेळीपालनासाठी उपलब्ध सुविधा आणि प्रक्षेत्रावर करण्यात आलेल्या चारा पिकांच्या लागवडीची पाहणी केली. चारा पिकांचे उत्पादन आणि प्रकल्पातील कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

चारा उपलब्धतेचा घेतला आढावा

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील चारा उपलब्धतेचाही त्यांनी आढावा घेतला. सध्या तालुक्यात पुरेसा चारा उपलब्ध असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. भविष्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण झाल्यास त्यावर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी चारा साक्षरता अभियान, रब्बी हंगामातील वैरण बियाणे वाटप आणि चारा लागवडीच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. तसेच VB-G-RAMG योजनेंतर्गत चारा लागवडीसाठी मका, ज्वारी आणि बाजरी या वैरण बियाण्यांचा समावेश करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.

या क्षेत्रीय भेटीदरम्यान सहाय्यक आयुक्त डॉ. संदीप निकम, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा कापसे आणि डॉ. विशाल गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. जलसंधारण, ग्रामविकास आणि पशुसंवर्धनाच्या योजनांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button