‘तो’ निर्णय भोवला; भडगाव तहसीलदारांच्या चौकशीचे आदेश

सप्टेंबर 9, 2026 11:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जमीन महसूल संहितेच्या कलम १५५ चा कथित गैरवापर केल्याप्रकरणी भडगावच्या तहसीलदार शीतल सोलाट यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्त कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

bhadgaon jpg webp

सातबारा उताऱ्यावरून एका वारसाचे नाव कमी करण्याचा तहसीलदार सोलाट यांनी घेतलेला निर्णय यापूर्वीच औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला आहे. त्यानंतर आता कलम १५५ अंतर्गत करण्यात आलेल्या तक्रारीवरून त्यांची प्रशासकीय चौकशी होणार असल्याने महसूल विभागात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनेचे शहरप्रमुख नंदकिशोर रमेश पाटील यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, टोणगाव शिवारातील गट क्रमांक ५६१/१ मधील वारस मयत नबाबाई शामा पाटील यांचे नाव तहसीलदारांकडून सातबारा उताऱ्यावरून कमी करण्यात आले होते. या निर्णयाविरोधात प्रकरण उच्च न्यायालयात गेले. सुनावणीदरम्यान औरंगाबाद खंडपीठाने तहसीलदारांनी घेतलेला निर्णय रद्दबातल ठरवला. त्यामुळे आता कलम १५५ च्या वापराबाबत करण्यात आलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी

विभागीय आयुक्त कार्यालयातील भूसुधार विभागाचे सहाय्यक आयुक्त विठ्ठल सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या माध्यमातून तहसीलदार शीतल सोलाट यांची चौकशी केली जाणार असून त्याचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.या चौकशीच्या अहवालात नेमके काय निष्पन्न होते, याकडे आता महसूल विभागाचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now