
जळगाव लाईव्ह न्यूज । यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून विद्यमान सभापती उज्जैनसिंग राजपूत आणि उपसभापती दीपक चौधरी यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. दरम्यान, नवीन सभापती आणि उपसभापतींची निवड उद्या ४ नोव्हेंबर रोजी होणार असून या पदांसाठी भाजपचे संचालक उमेश प्रभाकर पाटील आणि पंकज दिनकर चौधरी यांची नावे सध्या चर्चेत आघाडीवर आहेत.
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांची सत्ता आहे. संचालक मंडळात महायुतीचे बहुमत असून, सुरुवातीपासूनच पदांचे वाटप ठरलेल्या अंतर्गत नियोजनानुसार करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार विद्यमान सभापती उज्जैनसिंग भाऊलाल राजपूत आणि उपसभापती दीपक दिनकर चौधरी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. संचालक मंडळातील इतर सदस्यांनाही नेतृत्वाची संधी मिळावी, हा यामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
नवीन सभापती आणि उपसभापती निवडीसाठी ४ नोव्हेंबर रोजी बाजार समितीच्या सभागृहात संचालक मंडळाची विशेष बैठक होणार आहे. सभापतीपदासाठी भाजपचे संचालक उमेश प्रभाकर पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. तर उपसभापतीपदासाठी भाजपचेच संचालक पंकज दिनकर चौधरी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
मात्र, या दोन्ही पदांसाठी सागर राजेंद्र महाजन आणि कांचन ताराचंद फालक यांच्या नावांचाही विचार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अंतिम निवड कोणाची होते, याबाबत अद्याप उत्सुकता कायम आहे. नवीन सभापती आणि उपसभापतींच्या नावांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी आज संध्याकाळी आमदार अमोलदादा जावळे यांच्या उपस्थितीत पक्षाचे पदाधिकारी आणि संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत इच्छुकांची नावे आणि पक्षांतर्गत समन्वयावर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.
त्यामुळे उद्या होणाऱ्या निवडीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेश पाटील आणि पंकज चौधरी यांच्या नावांवर शिक्कामोर्तब होते की अन्य संचालकांना संधी दिली जाते, याकडे यावल तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





