
जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्य केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनच्या (Maharashtra State Chemists and Druggists Association) सन २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी शिर्डी येथे झालेल्या निवडणुकीत जे. एस. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजय मिळवला. त्यात संघटनेच्या अध्यक्षपदी जे. एस. शिंदे यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदासाठी जळगाव जिल्हा औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी संपूर्ण पॅनलमध्ये सर्वाधिक मते मिळवत धमाकेदार विजय प्राप्त केला असून, जळगाव जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर उंचावले आहे.
या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत जे. एस. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल आणि मदन पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘स्वाभिमानी पॅनल’ यांच्यात थेट आणि चुरशीची लढत झाली. या निवडणुकीसाठी एकूण ३४५ मतदार असताना, तब्बल ३४१ प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीअंती शिंदे पॅनलच्या उमेदवारांनी विरोधकांवर स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले.
यात उपाध्यक्षपदासाठी जळगावचे सुनील भंगाळे यांनी विक्रमी २६३ मते मिळवत संपूर्ण पॅनलमध्ये सर्वाधिक मतांचा टप्पा गाठला, तर जगन्नाथ शिंदे यांनी २५९ मते घेत अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा एकदा आपल्या हाती कायम ठेवल्या आहेत. उपाध्यक्षपदाच्या दुसऱ्या जागेसाठी लातूरचे रामदास भोसले यांना २३८ मते मिळाली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड
निवडणुकीत सचिवपदी अनिल नावंदर यांनी २५१ मते मिळवत विजय मिळवला. खजिनदारपदी वैजनाथ जागुस्टे यांना २२० मते, तर संघटन सचिवपदी पंकज नानवानी यांना २१९ मते मिळाली. सहसचिवपदी सुनील छाजेड यांची बिनविरोध निवड झाली. तसेच नवनिर्वाचित कार्यकारिणीतर्फे अजित पारेख यांची जनसंपर्क अधिकारी म्हणून घोषणा करण्यात आली.
निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी दिलीप कदम, दिलीप देशमुख आणि नितीन देव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांचा गौरव करण्यात आला.
या निवडणुकीतील सुनील भंगाळे यांच्या यशामुळे जळगाव जिल्हा औषध विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आगामी तीन वर्षांच्या कार्यकाळात राज्यातील औषध विक्रेत्यांच्या प्रश्नांवर आणि संघटनेच्या कामकाजावर नवनिर्वाचित कार्यकारिणीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.





