
जळगाव लाईव्ह न्यूज । बोदवड तालुक्यातील लोणवाडी येथे शेतीचे काम करताना झालेल्या दुर्दैवी अपघातात २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गोपाल रवींद्र बावस्कर असे मृत तरुणाचे नाव आहे. शेतात मका काढण्याचे काम सुरू असताना अचानक घडलेल्या या घटनेमुळे बावस्कर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, लोणवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, गोपाल बावस्कर हा आपल्या शेतात मका काढण्याच्या कामासाठी गेला होता. काम सुरू असताना तो ट्रॅक्टरवर उभा होता. त्याचवेळी अचानक त्याचा पाय घसरला आणि तो ट्रॅक्टरखाली पडला. यावेळी ट्रॅक्टरचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
गोपाल हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. कुटुंबात आई-वडील आणि गोपाल असे तिघेच होते. कुटुंबाचा आधार असलेल्या तरुणाचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गोपालच्या अकाली निधनाने बावस्कर कुटुंबाचा मोठा आधार हरपला असून, या घटनेने संपूर्ण लोणवाडी गावावर शोककळा पसरली आहे. तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.





