
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावकरांना सध्या बदलत्या हवामानाचा सामना करावा लागत आहे. दिवसा कडक ऊन आणि रात्री जाणवणारी थंडी यामुळे तापमानात मोठी तफावत दिसून येत आहे. रविवारी जळगावातील कमाल तापमान ३५.२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १५.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. दरम्यान, २८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने हवामानात आणखी बदल होण्याचा अंदाज आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यात दिवसा ऑक्टोबर हीटचा प्रभाव जाणवत असून, उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांची काहिली होत आहे. दुसरीकडे, रात्री आणि पहाटेच्या सुमारास थंडीचा अनुभव येत आहे. विशेष म्हणजे, शनिवारी किमान तापमान २०.५ अंश सेल्सिअस होते, ते रविवारी थेट १५.५ अंशांवर घसरले. त्यामुळे अवघ्या एका दिवसात किमान तापमानात तब्बल ५ अंशांची घट नोंदवण्यात आली. या बदलत्या हवामानामुळे नागरिकांना दिवसा उन्हाचे चटके, तर रात्री थंडीचा सामना करावा लागत आहे.
२७ ऑक्टोबरपर्यंत आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज
दरम्यान, २५ ते २७ ऑक्टोबरदरम्यान आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. या काळात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, तर किमान तापमान १५ ते १६ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दिवसा उकाडा आणि रात्री थंडी असे हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.
महिनाअखेरीस हवामान बदलणार?
२८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, तुरळक पावसाच्या सरी कोसळू शकतात. या कालावधीत कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांपर्यंत खाली येण्याचा, तर किमान तापमान १७ ते १९ अंशांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
एकीकडे दिवसा उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे रात्रीची थंडी, अशा बदलत्या वातावरणामुळे नागरिकांना सतर्क राहावे लागणार आहे. हवामानातील बदल लक्षात घेता नागरिकांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अंदाजावर लक्ष ठेवावे.





