गुन्हेजळगाव शहर

जळगावात विजेचा धक्का लागून महावितरणच्या वायरमनचा मृत्यू; महिनाभरात दुसरी घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । वीज खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा जोरदार धक्का लागून महावितरणचे वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जळगावातील एमआयडीसी परिसरात घडली. किरण सपकाळे (वय ४२) असं मयत वायरमनचे नाव असून वीजपुरवठा खंडित करण्याची परवानगी घेतल्यानंतरही अचानक वीजपुरवठा सुरू झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे

दुरुस्तीचे काम करताना काळाचा घाला

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, किरण सपकाळे हे एमआयडीसी परिसरात वीज खांबावर दुरुस्तीचे काम करत होते. काम सुरू करण्यापूर्वी वीजपुरवठा खंडित करण्याची परवानगी घेण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही वीजपुरवठा सुरू झाल्याने सपकाळे यांना विजेचा जोरदार धक्का बसला. धक्का लागल्यानंतर ते खांबावरून खाली कोसळले.

घटनेनंतर त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेने महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

महिनाभरात दुसऱ्या मृत्यूने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

किरण सपकाळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, महिनाभरात वायरमनच्या मृत्यूची ही दुसरी घटना असल्याने वीज दुरुस्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही तो पुन्हा सुरू कसा झाला, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी आणि वीजपुरवठा खंडित करण्याच्या प्रक्रियेतील समन्वय अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button