जळगाव जिल्हा

ड्रग्ज, दहशतवाद अन् गुन्हे तपास; जळगाव पोलिसांसाठी विशेष प्रशिक्षण

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासह गुन्हे तपासाची गुणवत्ता सुधारणे, अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करणे आणि दहशतवादविरोधी सज्जता बळकट करण्याच्या उद्देशाने शनिवारी (२४ ऑक्टोबर) विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या प्रशिक्षण उपक्रमात चार महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये तपासातील त्रुटी, एनडीपीएस कायद्यांतर्गत तपास, दहशतवादविरोधी यंत्रणांचे कार्य आणि पोलिसिंगमधील भावनिक बुद्धिमत्ता या विषयांचा समावेश आहे.

गुन्ह्यांच्या तपासादरम्यान होणाऱ्या तांत्रिक आणि प्रक्रियात्मक चुका टाळण्यासाठी सहायक सरकारी अभियोक्ता सुनील चोर्डिया हे ‘तपासातील त्रुटी व उणिवा’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. पुराव्यांचे संकलन, साक्षीदारांचे जबाब, कायदेशीर तरतुदींचे पालन आणि आरोपपत्रातील त्रुटी यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींवर या सत्रात प्रकाश टाकला जाणार आहे.

तपासातील उणिवांमुळे न्यायालयीन प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ नयेत आणि गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यास मदत व्हावी, यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची माहिती पोलिसांना दिली जाणार आहे.

अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये कायदेशीर प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर ‘एनडीपीएस कायद्यांतर्गत तपास’ या विषयावर बोडवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी गाझियाबाद येथील अकादमीमध्ये एनडीपीएस विषयावरील पाच दिवसीय विशेष कार्यशाळेत सहभाग घेतला आहे.

या सत्रात घटनास्थळावरील कारवाई, अंमली पदार्थांची जप्ती, पंचनामा, नमुने घेण्याची पद्धत, सीलिंग, जप्त मुद्देमालाची सुरक्षित साखळी अर्थात ‘चेन ऑफ कस्टडी’ आणि न्यायालयात पुरावे ग्राह्य धरण्यासाठी आवश्यक प्रक्रियांवर व्यावहारिक मार्गदर्शन केले जाणार आहे.

दहशतवादविरोधी सज्जतेसाठी एटीएस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

बदलत्या सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाची दहशतवादविरोधी सज्जता वाढविण्यासाठी ‘PRAHAAR, ATB व ATC यांचे कार्य’ या विषयावर एटीएस पुणेचे पोलीस अधीक्षक संभाजी कदम मार्गदर्शन करणार आहेत.संभाव्य धोक्यांची वेळेत ओळख, गुप्त माहितीचे संकलन व विश्लेषण, विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्याची क्षमता यावर या सत्रात भर दिला जाणार आहे. क्षेत्रीय स्तरावर पोलिसांनी कोणती खबरदारी घ्यावी आणि सुरक्षा यंत्रणांशी समन्वय कसा साधावा, याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.

पोलिसांना भावनिक बुद्धिमत्तेचे धडे

पोलिसांचे काम अनेकदा तणावपूर्ण आणि आव्हानात्मक परिस्थितीत सुरू असते. अशा वेळी संयम राखणे, नागरिकांशी संवेदनशीलतेने संवाद साधणे आणि योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते. या अनुषंगाने जळगावचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते हे ‘पोलिसिंगमधील भावनिक बुद्धिमत्ता’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना या विषयावर मार्गदर्शन करण्याचा त्यांना अनुभव आहे. तणावाचे व्यवस्थापन, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण, संघर्ष निवारण, नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता यांसारख्या बाबींवर ते मार्गदर्शन करतील.

तपासाची गुणवत्ता आणि नागरिकांशी संवाद सुधारणार

या विशेष प्रशिक्षण उपक्रमातून पोलीस दलाच्या कामकाजातील विविध महत्त्वपूर्ण पैलूंवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गुन्हे तपासातील कायदेशीर काटेकोरपणा, अंमली पदार्थविरोधी कारवाईतील प्रक्रियात्मक शिस्त, दहशतवादविरोधी सज्जता आणि भावनिक बुद्धिमत्तेचा वापर यांमुळे पोलिसांच्या व्यावसायिक कौशल्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.

कायदा व सुव्यवस्था राखताना नागरिकांशी योग्य संवाद साधणे आणि कायदेशीर प्रक्रियांचे पालन करणे यांना महत्त्व असल्याने हा उपक्रम जिल्हा पोलीस दलासाठी उपयुक्त ठरणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button