जळगाव शहर

जळगावात १० दिवसांच्या नवजात बालिकेला उघड्यावर टाकून पलायन; पेंटरच्या सतर्कतेने जीव वाचला

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. अवघ्या १० दिवसांच्या नवजात बालिकेला निर्जनस्थळी बेवारस अवस्थेत सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चिमुकलीला मुंग्या चावत असताना एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत तिला सुरक्षितस्थळी हलवले आणि पोलिसांना माहिती दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, बालिकेला बेवारस सोडणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध रामानंद नगर पोलीस घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास गिरणागाव-पिंप्राळा रेल्वे पुलालगत आझादनगरकडून पिंप्राळ्याकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या बाजूला एका निर्जन ठिकाणी अवघ्या १० दिवसांच्या स्त्री जातीच्या अर्भकाला सोडून देण्यात आले होते. हा परिसर मृत जनावरे टाकण्यासाठी वापरला जात असल्याने तेथे अस्वच्छता असून, वर्दळही कमी असते.

याच ठिकाणी चिमुकलीला बेवारस सोडण्यात आल्याने तिच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. अर्भकाला मुंग्या चावत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तेथून जाणाऱ्या शिवाजी मधुकर गायकवाड यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.

पेंटर शिवाजी गायकवाड ठरले चिमुकलीसाठी देवदूत

हरी विठ्ठल नगर येथे राहणारे शिवाजी मधुकर गायकवाड (वय ३५, व्यवसाय पेंटर) यांनी क्षणाचाही विलंब न करता बालिकेला सुरक्षितस्थळी हलवले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यांच्या समयसूचकतेमुळे या चिमुकलीला वेळीच मदत मिळाली.

या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी बालिकेची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. तिच्या वैद्यकीय उपचारांसह पुढील देखभालीबाबत संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि बालकल्याण समितीशी चर्चा करण्यात आली. संकटाच्या वेळी धावून येत बालिकेला मदत करणाऱ्या शिवाजी गायकवाड यांच्या संवेदनशीलतेचे आणि प्रसंगावधानाचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३११/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ९३ तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ मधील कलम ७५ आणि इतर संबंधित कलमांन्वये अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अवघ्या काही दिवसांच्या या निष्पाप बालिकेला अशा प्रकारे निर्जनस्थळी कोणी आणि कोणत्या कारणाने सोडले, याचा तपास पोलीस करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button