
जळगाव लाईव्ह न्यूज । नवरात्रोत्सव भयमुक्त आणि शांततेच्या वातावरणात पार पडावा, यासाठी जळगाव जिल्हा पोलिस दलाने संपूर्ण जिल्ह्यात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ ही विशेष धडक मोहीम राबवली. या मोहिमेत अवैध दारूविक्री, जुगार, शस्त्रे बाळगणे, अमली पदार्थ आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध तीन हजारांहून अधिक कारवाया करण्यात आल्या. मोटार वाहन कायद्यानुसार २ हजार ७६ प्रकरणे दाखल करून १६ लाख ३३ हजार ५२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच अवैध दारूचा साठा, शस्त्रे आणि जुगाराची रोकड जप्त करण्यात आली.
पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित आणि अशोक नखाते यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या पथकांनी ही मोहीम राबवली. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करणे, हा या मोहिमेचा उद्देश होता.
अवैध दारूविक्रीवर कारवाई; ११८ गुन्हे दाखल
जिल्ह्यात अवैध गावठी हातभट्टी दारूविक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली. या प्रकरणांत ११८ गुन्हे दाखल करून ११८ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ५ लाख ७ हजार ४१४ रुपयांचा दारूसाठा आणि दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले.
जुगारविरोधी कारवाईत ७२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ८५ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५१ हजार २५५ रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. शस्त्रविषयक कारवाईत एक गावठी कट्टा आणि एक तलवार जप्त करण्यात आली.
मद्यपी वाहनचालकांवर पोलिसांचा बडगा
मद्यप्राशन करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या ३५ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ३६ चालकांवर ड्रंक अँड ड्राइव्हअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली.
मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातही व्यापक मोहीम राबवण्यात आली. यामध्ये एकूण २ हजार ७६ प्रकरणे नोंदवून १६ लाख ३३ हजार ५२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय जिल्ह्यातील १०९ भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली. शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरातील ११ पानटपऱ्यांवरही कारवाई करून त्या हटवण्यात आल्या. अमली पदार्थांशी संबंधित १६ गुन्हेही दाखल करण्यात आले.
सोशल मीडियावरील रील्सवर पोलिसांची नजर
नवरात्रोत्सवाच्या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. या मोहिमेत सोशल मीडिया रील्ससंदर्भात २१ कारवाया करण्यात आल्या. समाजात तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे रील्स तयार करून प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांनी दिला.
सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील ६७ हॉटेल्स आणि ढाब्यांची अचानक तपासणी करण्यात आली. उत्सवाच्या काळात संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासह संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क ठेवण्यावर पोलिसांचा भर आहे.
बेपत्ता १६४ व्यक्तींचा शोध; १० वाँटेड आरोपी जेरबंद
‘ऑपरेशन ऑल आऊट’दरम्यान बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीमही राबवण्यात आली. त्यात ६२ महिला, ४६ पुरुष, ३० मुली आणि २ लहान मुलांसह एकूण १६४ व्यक्तींचा शोध घेण्यात आला. तसेच फरार आणि वाँटेड असलेल्या १० आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले.
नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह संदेश पुढे पाठवणे टाळावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.





