जळगाव जिल्हा

जळगावकरांना महागाईचा आणखी एक झटका! आजपासून ‘विकास’ दूध महागले

जळगाव लाईव्ह न्यूज । आधीच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले असताना आता जळगावकरांना दूध दरवाढीचा आणखी एक झटका बसला आहे. जळगाव जिल्हा दूध संघाने ‘विकास’ ब्रँडच्या सर्व प्रकारच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केली आहे.

या दरवाढी नंतर आता गोल्डचे दूध ८० रुपये प्रति लिटर, तर गायीचे दूध ६२ रुपये प्रति लिटर झाले आहे. ही दरवाढ रविवार, दि. ११ ऑक्टोबरपासून लागू झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरखर्चात आणखी वाढ होणार आहे.

वर्षभरात तिसऱ्यांदा दरवाढ

जळगाव जिल्हा दूध संघाने चालू वर्षात तिसऱ्यांदा दूध दरवाढ केली आहे. यापूर्वी २७ फेब्रुवारी आणि १२ ऑगस्ट रोजी दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा २ रुपयांची वाढ झाल्याने वर्षभरात ‘विकास’ दुधाच्या दरात एकूण ६ रुपयांची वाढ झाली आहे. या सततच्या दरवाढीमुळे दूध ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे.

दुष्काळी परिस्थितीचा दूध उत्पादनाला फटका

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि दुधाची घटलेली आवक यामुळे दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दूध संघातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दुष्काळामुळे दूध उत्पादनावर विपरीत परिणाम झाला असून, दूध खरेदीच्या दरातही वाढ झाली आहे. परिणामी, वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी विक्रीच्या दरात वाढ करावी लागत असल्याचे संघाने सांगितले.

जळगावसह इतर जिल्ह्यांतही दरवाढ लागू

ही दरवाढ जळगाव शहर, तालुका, संपूर्ण जिल्हा तसेच इतर जिल्ह्यांमध्येही समान पद्धतीने लागू करण्यात आली आहे. जळगाव शहरातील दूध विक्रीमध्ये ‘विकास’ दुधाचा सुमारे ५० टक्के हिस्सा असल्याने या दरवाढीचा मोठा परिणाम ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे. त्यातच दुष्काळी परिस्थिती कायम राहिल्यास दुधाची आवक आणखी घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असताना आता दुधाच्या दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे मासिक आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात दूध उत्पादन आणि पुरवठ्याची स्थिती कशी राहते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button