
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहर आणि भुसावळ परिसरात खळबळ उडवून देणारा संभाव्य गँगवार व दुहेरी हत्याकांडाचा मोठा कट जळगाव पोलिसांनी अत्यंत शिताफीने उधळून लावला आहे. भुसावळ येथील सराईत गुन्हेगारांचा खून करून त्यांच्या अंगावरील सोने लुटण्याच्या उद्देशाने जळगावात आलेल्या ५ कुख्यात आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कटासाठी तब्बल ३५ लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या कारवाईत चार गावठी कट्टे, नऊ जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रे आणि ६२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या धडक कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री भुसावळ येथील मिथुन बारसे आणि क्रिश बारसे हे जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यांच्यावर हल्ला करून हत्या करणे आणि त्यांच्या अंगावरील सोने लुटण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पिंप्राळा परिसरातील भवानीमाता मंदिर ते सिल्कमिलसमोरील मोकळ्या जागेत सापळा रचण्यात आला. यावेळी इनोव्हा कारवर छापा टाकून पोलिसांनी खुशाल गजानन बोरसे (रा. खडकारोड, भुसावळ), संदीप बबन लोढे (रा. वाघनगर, जळगाव), राणू उर्फ ओमकार भदरगे (रा. शास्त्रीनगर, ठाणे), अरविंद विजय कांबळे (रा. कासोळा, जि. वाशिम) आणि सोनू महेंद्र जयस्वाल (रा. सातिवली, वसई, जि. पालघर) या पाच जणांना अटक केली.
३५ लाखांची सुपारी; पाच लाख रुपये अॅडव्हान्स
या प्रकरणाच्या सखोल तपासात भुसावळ येथील दुहेरी हत्याकांडात फरार असलेले बंटी पथरोड आणि शिव पथरोड यांनी मिथुन बारसे, क्रिश बारसे आणि करण यांची हत्या करण्यासाठी ३५ लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. यापैकी पाच लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून दिल्याचीही माहिती तपासात उघड झाली आहे.या कटामागील मुख्य सूत्रधार म्हणून बंटी पथरोड, शिव पथरोड आणि अभिषेक गोयर, तर मध्यस्थ म्हणून रवी होळकर यांची नावे पुढे आली आहेत. पोलिसांनी या चौघांचीही आरोपी म्हणून गुन्ह्यात वाढ केली आहे.
चार गावठी कट्टे, काडतुसे आणि धारदार शस्त्रे जप्त
अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी दोन गावठी कट्टे, सात जिवंत काडतुसे, धारदार सुरा, कोयता, मिरची पावडर, दोऱ्या, मास्क, पाच मोबाईल फोन आणि इनोव्हा कार असा मुद्देमाल जप्त केला. या मुद्देमालाची किंमत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ९ लाख ७७ हजार ६०० रुपये आहे.
आरोपींची चौकशी केली असता त्यांनी जळगाव तालुक्यातील उमाळा येथे खुनाच्या कटासाठी एक खोली भाड्याने घेतल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या खोलीची पंचांसमक्ष झडती घेतली असता आणखी दोन गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, विक्रीसाठी ठेवलेले ६२ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज आणि इलेक्ट्रिक वजनकाटा आढळून आला. या मुद्देमालाची किंमत दोन लाख २२ हजार ३०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
विविध कलमांनुसार गुन्ह्यात वाढ
या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान समोर आलेले तथ्य, शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांची जप्ती लक्षात घेऊन वाढीव कलमांची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अटक आरोपी खुशाल गजानन बोरसे याच्याविरुद्ध यापूर्वी पाच, तर अरविंद विजय कांबळे याच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल आहे. फरार आरोपी बंटी परशुराम पथरोड याच्याविरुद्ध १९, तर शिव परशुराम पथरोड याच्याविरुद्ध १२ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, दीपक जगदाळे, संतोष पवार, जितेंद्र वल्टे, सहायक पोलीस निरीक्षक अंकुश वारुंगसे यांच्यासह रामानंद नगर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.





