जळगाव जिल्हा

नवरात्रीत उन्हाचा तडाखा वाढणार! जळगावचा पारा थेट.. वाचा हवामानाचा अंदाज?

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२६ । जळगावकरांचा ऑक्टोबर हिटचा त्रास काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नसून, गेल्या काही दिवसांपासून दिवसभर जाणवणाऱ्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच आता नवरात्रोत्सवातही उन्हाचा तडाखा कायम राहण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या चार दिवसांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. विशेष म्हणजे, १२ ते १६ ऑक्टोबरदरम्यान पावसाची शक्यता नसून आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दिवसा कडक ऊन आणि उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.

नवरात्रोत्सवाच्या काळात बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. तसेच अनेक भाविक साडेतीन शक्तिपीठांच्या दर्शनासाठी प्रवास करतात. मात्र, यंदा उत्सवाच्या काळात पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने दिवसा उन्हाचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. आकाश निरभ्र राहणार असल्याने सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडतील. परिणामी, दुपारच्या वेळी उन्हाचे चटके आणि उकाडा अधिक जाणवू शकतो.

एकीकडे कमाल तापमानात वाढ होत असली, तरी दुसरीकडे हळूहळू थंड हवेचा प्रभाव जाणवू लागला आहे. त्यामुळे रात्रीच्या तापमानात काही प्रमाणात घट होत आहे. परिणामी, दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री तुलनेने कमी तापमान, असे हवामानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

पुढील चार दिवस हवामान कसे राहणार?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १२ ते १६ ऑक्टोबरदरम्यान आकाश पूर्णपणे निरभ्र राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत कमाल तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअसदरम्यान राहू शकते. आर्द्रता ७० टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज असल्याने प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.

त्यामुळे नवरात्रोत्सवात गरबा, दांडिया, देवीदर्शन आणि खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना दिवसा उन्हाचा सामना करावा लागू शकतो. उत्सवाचा आनंद घेताना नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button