गुन्हेभुसावळ

तरुणाच्या मृत्यूप्रकरणी भुसावळच्या भाजप नगरसेवकाच्या भावासह दोघांना अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरालगत वरणगाव महामार्गावरील एका वॉटर पार्कसमोर भूषण उल्हास व्हावले (वय २१, रा. गांधीनगर, भुसावळ) या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान आर्थिक वादातून फार्महाऊसवर झालेल्या जबर मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असून याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी भाजप नगरसेवक राजेंद्र आवटे यांचा भाऊ संजय ऊर्फ संजू आवटे आणि प्रमोद बलराम लावरिया या दोघांना अटक केली आहे. तर अफसर मेमन हा संशयित फरार आहे.

नेमकी घटना काय?

बीए पूर्ण केलेला भूषण व्हावले हा गेल्या दोन वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचे काम करत होता. याच आर्थिक व्यवहारांवरून संशयित संजय आवटेसोबत त्याचा वाद सुरू होता. बुधवारी दुपारपासून भूषणला सातत्याने फोन येत होते. तो घराबाहेर पडल्यानंतर त्याची आईही त्याच्यासोबत साकरी फाटा येथील संजय आवटे याच्या फार्महाऊसवर गेली होती.

तिथे पैशांची मागणी करण्यात आल्यानंतर, “आम्ही पैशांची व्यवस्था करतो,” अशी समजूत भूषणच्या आईने काढली होती. तसेच त्यांनी पतीला फोन करून फार्महाऊसवर आल्याची माहिती दिली. त्यानंतर आई घरी परतली, मात्र भूषण रात्री फार्महाऊसवरच थांबला होता. रात्री भूषणने फोन करून ‘मी जेवण करत आहे’ असा निरोप दिला; मात्र गुरुवारी सकाळी त्याचा थेट मृतदेहच महामार्गावर आढळून आला.

गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलिसांना वरणगाव महामार्गावर मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

मृताचा भाऊ विशाल उल्हास व्हावले याने दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई करत संजय ऊर्फ संजू आवटे व प्रमोद लावरिया या दोघांना अटक केली असून अफसर मेमन हा संशयित सध्या पसार आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि डीवायएसपी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपीचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button